संपगावमध्ये हिंदू-मुस्लीम सलोख्याचे दर्शन
श्री विसर्जन मिरवणुकीत उत्साहात सहभाग
बेळगाव : श्री विसर्जन मिरवणुकीवेळी कर्नाटकातील अनेक जिल्ह्यात दगडफेक, हाणामारी व जातीय तेढ निर्माण झाले आहेत. यावेळी संपूर्ण राज्यात एक स्फोटक अशी परिस्थिती असतानाच काही ठिकाणी हिंदू-मुस्लीम सलोख्याचे दर्शनही घडले आहे. संपगाव, ता. बैलहोंगल येथे तर मुस्लीम बांधवांनी श्रीमूर्तीवर दोन क्विंटल फुलांचा वर्षाव केला आहे. संपगाव येथे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात तणावपूर्ण स्थिती असायची. ही गोष्ट लक्षात घेऊन यावेळी बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, पोलीस निरीक्षक पंचाक्षरी सालीमठ आदी अधिकाऱ्यांनी संपगावला भेट देऊन दोन्ही समाजाची बैठक घेतली व नागरिकांना सलोख्याचे धडे दिले.
एखादी अप्रिय घटना घडल्यानंतर तणाव निर्माण होतो. पोलीस हस्तक्षेप करतात. परिस्थिती नियंत्रणाखाली आणतात.नंतरच्या काळात गावात सर्वांना एकत्रितपणे रहायचे असते. ही गोष्ट लक्षात घेऊन आधीच समस्या निर्माण होऊ नये, यासाठी दोन्ही समाजातील नेत्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांनी केले. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. 17 सप्टेंबर रोजी श्री विसर्जनाच्या दिवशी मुस्लीम समाजातील अनेक नेते मिरवणुकीत सहभागी झाले. श्रीमूर्तीला पुष्पहार घालण्याबरोबरच तब्बल दोन क्विंटल फुलांचा वर्षाव केला. सरदार काद्रोळी, मलिक इराणी, दादापीर मत्तीकोप्प, मंजुनाथ उळ्ळी आदींसह दोन्ही समाजातील नेते, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. जातीय सलोखा राखून आदर्श पायंडा घालणाऱ्या नेत्यांबरोबरच यासाठी कारणीभूत ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी स्वत: यासंबंधी माहिती दिली आहे.