विश्वनाथ, आकाश, प्रीत उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ अॅस्ताना (कझाकस्तान)
येथे सुरु असलेल्या एएसबीसी आशियाई 22 वर्षाखालील तसेच युवा मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या विश्वनाथ सुरेश, आकाश गुरखा आणि प्रीत मलिक यांनी आपल्या वजन गटातून पुरूषांच्या 22 वर्षाखालील वयोगटाच्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली आहे.
पुरूषांच्या 48 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताचा विद्यमान विश्व युवा चॅम्पियन विश्वनाथ सुरेशने इराणच्या हेसानी एस. चा 5-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. पुरूषांच्या 60 किलो वजन गटात भारताचा वरिष्ठ गटातील राष्ट्रीय विजेता आकाश गुरखाने इराणच्या इबादी अर्मानचा 5-0 असा फडशा पाडत शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले. 67 किलो वजन गटात प्रीती मलिकने व्हिएतनामच्या निगोकचा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. 75 किलो वजन गटात भारताच्या कुणालला इराणच्या मोहम्मदने 5-0 असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. 86 किलो गटात जुगनू, 92 किलोवरील गटात रिदम, 50 किलो गटात तमन्ना, 54 किलो गटात प्रीती आणि 60 किलो गटात प्रियांका यांच्या 22 वर्षाखालील वयोगटाच्या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत मंगळवारी उशिरा होत आहेत.
युवा कॅटेगेरीमध्ये सोमवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत 75 किलो गटात राहुल कुंडू, 92 किलोवरील गटात लक्ष्य राठी, 50 किलो गटात लक्ष्मी, 54 किलो गटात तमन्ना, 57 किलो गटात यात्री पाटेल आणि 63 किलो गटात सृष्टी साठे यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विजय नोंदवित उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. या स्पर्धेमध्ये 24 देशांचे सुमारे 400 स्पर्धक सहभागी झाले आहेत.