अनगोळ येथे विश्वकर्मा जयंती उत्सव उत्साहात
बेळगाव : अनगोळ येथील विश्वकर्मा मनुमय संस्था यांच्यावतीने सोमवारी प्रभू श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त प्रभू विश्वकर्मा मंदिर येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सोमवारी सकाळी 8.30 वाजता एस. लक्ष्मी इंटरप्रायझेसचे संचालक प्रकाश सावंत सुतार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री विश्वकर्मा मूर्तीवर महाअभिषेक घालण्यात आला व महाआरती करण्यात आली. यावेळी मंडळाच्या अध्यक्ष वनिता सुतार, तसेच सचिव लक्ष्मी लोहार, कार्याध्यक्ष अलका लोहार यांच्यासह अन्य महिलांनी पाळणागीते सादर केली.
यावेळी मंदिरासाठी देणगी देणाऱ्या दीपक कुमार, सभासद संदीप मंडोळकर, वनिता सुतार यांचा मंडळाचे माजी अध्यक्ष परशराम लोहार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, महादेव लोहार, दीपक सोमणाचे यांचा सत्कार करण्यात आला.
दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी श्री गुऊदत्त सेवा भजनी महिला मंडळाचे भजन झाले. नंतर महिला मेळाव्यास एंजल फाउंडेशनच्या मीना बेनके, अर्चना मेस्त्री, सुवर्णा पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते चित्रकला, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू चमचा या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर श्रीराम भजनी मंडळ व माउली भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. श्री प्रभू विश्वकर्मा आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्याध्यक्ष सागर लोहार यांनी आभार मानले. यावेळी सचिव सचिन सुतार, खजिनदार किरण लोहार, उपसचिव अभिषेक सुतार, राहुल सुतार, पदाधिकारी, समाजबांधव उपस्थित होते.