विश्वजित मोरे उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था/ नोवि साद, सर्बिया
भारताच्या विश्वजित मोरेने येथे सुरू असलेल्या यू-23 वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये ग्रीको-रोमन प्रकारात उपांत्यपूर्व फेरी गाठत भारतीय गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. मात्र त्याच्या अन्य तीन देशबांधवांना पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले.
विश्वजित मोरेने किर्गीझच्या डेनिस फ्लोरिन मिहाइवर 6-2 अशी मात करून आपल्या मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर तांत्रिक सरसतेवर अमेरिकेच्या केनेथ अँड्य्रू क्रॉसबीला 9-1 अशा गुणांनी हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. निशांत (67 किलो गट), अनिल (67 किलो गट) व नमन (97 किलो गट) यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभव झाल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. निशांतला अझरबैजानच्या फरइम मुस्तफायेवहने 8-3, अर्मेनियाच्या गास्पर टेर्टेरियनने अनिलला 6-1 असे पराभूत केले. नमनला पात्रता फेरीतच अर्मेनियाच्या अर्शक गेघामियानकडून तांत्रिक सरसतेवर पराभूत व्हावे लागले. याशिवाय पहिल्या दिवशी गौरव (63 किलो), अंकित (77 किलो), रोहित बुरा (87 किलो), जोगिंदर राठी (130 किलो) यांना ग्रीको रोमन प्रकारात पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले.