एशियन कुस्ती स्पर्धेत विश्वजीत मोरे, धनराज जमनिक यांना रौप्यपदक
एमएलआयआरसीच्या कुस्तीपटूंचे यश
बेळगाव : जॉर्डन येथील अमान व थायलंड येथील शिराची येथे झालेल्या एशियन ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत बेळगावच्या एमएलआयआरसीचे कुस्तीपटू विश्वजित मोरे याने 23 वर्षांखालील तर धनराज जमनिक याने अंतिम फेरीत धडक मारुन रौप्य पदक पटकावित भारतीय कुस्ती संघाला दोन रौप्य पदके मिळवून दिली. त्याबद्दल बेळगावचे मराठा लाईट इन्फंट्रीचे ब्रिगेडीअर जॉयदीप मुखर्जी यांनी या दोघांचे कौतुक केले आहे. जॉर्डन, अम्मान येथे नुकत्याच झालेल्या एशियन ग्रिको रोमन पध्दतीच्या कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाने भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगावच्या एमएलआयआरसीचा कुस्तीपटू विश्वजित मोरे याने अंतिम फेरीत धडक मारली. त्याने आधीच्या फेऱ्यात अनेक दिग्गज मल्लांना पराभूत करुन अंतिम टप्पा गाठला. पण विश्वजितला अंतिम फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. त्याला या गटात रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
थायलंड येथील शिराची येथे झालेल्या 15 वर्षांखालील गटात ग्रिको रोमन प्रकारात एमएलआयआरसी कुस्तीपटू धनराज जमनिक याने या गटात उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीतून प्रतिस्पर्धी बलाढ्या मल्लांना धुळ चाखवत अंतिम फेरीत मजल मारली. अंतिम फेरीत त्याने प्रतिस्पर्धी मल्लाबरोबर कडवी लढत दिली. या लढतीत त्याला निसटता पराभव पत्करावा लागल्याने रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. विश्वजित मोरे व धनराज जमनिक हे दोघेही एमएलआयआरसीच्या कुस्ती प्रशिक्षक केंद्रात सराव करीत असून भारतीय लष्करदल अशा होतकरु मल्लांना नेहमीच प्रोत्साहन देत आले आहे. यापूर्वीही भारतीय सेनेतील अनेक मल्लांनी भारताला कुस्तीमध्ये पदके मिळवून दिली आहेत. भारतीय सेनेने अशा होतकरु मल्लांना प्रोत्साहन दिल्यामुळे अनेक मल्ल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवून भारताला पदके मिळवून देत आहेत.
विश्वजित मोरे व धनराज जमनिक यांच्या कामगिरीबद्दल एमएलआयआरसीचे कमांडर बिग्रेडीअर जॉयदीप मुखर्जी यांनी त्यांचे कौतुक करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. मराठा लाईट इन्फंट्रीच्या लष्करी दलातील कुस्तीपटूंनी अनेक स्पर्धांतून चमक दाखविली आहे. विश्वजित व धनराज यांच्या कामगिरीबद्दल आपण त्यांची शिफारस पुढील वाटचालीसाठी करत असून पुढील स्पर्धांसाठी तांत्रिकदृष्ट्या कलागुणांना वाव देण्यासाठी भारतीय सेना प्रयत्न करीत आहे. त्यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षकांचीही नेमणूक करीत आहे. भारतीय लष्कर अशा होतकरु मल्लांना सर्व सोयी, सवलती उपलब्ध करुन देत आहे. पुढील होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय सेना दलातील अनेक कुस्तीपटू भारतीय कुस्ती संघात स्थान मिळविले आहे. त्यांच्याकडूनही पदकांची अपेक्षा भारताला असून ते नक्कीच या स्पर्धांमध्ये यश मिळवतील, असा विश्वास ब्रिगेडीअरांनी व्यक्त केला.