विश्वजित यांनी मागितली दिगंबर कामत यांची जाहीर माफी
एकमेकांवर उधळली स्तुतीसुमने
प्रतिनिधी/ मडगाव
दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना आपण त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो, त्यावेळी दिगंबर कामत यांनी आपल्या अनेक प्रकल्पांना मान्यता दिली. प्रकल्पांना मान्यता देताना त्यांनी कधीच आडकाठी आणली नाही. मी राजकीयदृष्ट्या त्यांना त्या काळात बराच त्रास दिला. आपली ती चूक होती. आपण त्यांची जाहीर माफी मागतो, असे म्हणत आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल शनिवारी आमदार दिगंबर कामत यांची जाहीर माफी मागितली.
मडगावात काल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या पुढाकाराने महावैद्यकीय शिबिर आयोजित केले होते. या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याला त्यांनी उपस्थिती लावली होती.
दिगंबर कामत यांची साथ कधीच सोडणार नाही
दिगंबर कामत हे एक चांगले नेतृत्व असून, अशा नेत्याची आम्हाला गरज व मार्गदर्शन हवे आहे. आपण त्यांची कधीच साथ सोडणार नाही. आपल्याला ते वडिलांसमान असून आपण जसा आपल्या वडिलांचा आदर करतोय, तशाच आदर दिगंबर कामत यांचा करणार असल्याचे मंत्री राणे यांनी सांगितले.
दिगंबर कामत हे देवभक्ती करतात, विविध देवस्थानाला भेटी देत असतात, देवावर त्यांची श्रद्धा आहे. नि:स्वार्थीपणे जो देवाची प्रार्थना करतो, त्याला देव प्रसन्न होत असतो, मग तो कुठल्याही धर्मातील असू देत. दिगंबर कामत यांना देवाने चांगले आरोग्य देवो, असेही आरोग्यमंत्री राणे म्हणाले.
अन् दिगंबर कामत झाले भावूक ...
आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे केवळ दिगंबर कामत यांची जाहीर माफी मागून थांबले नाही तर त्यांनी त्यांच्या आरोग्याबद्दल देवाकडे प्रार्थनाही केली. या प्रसंगाने दिगंबर कामत भावूक झाले. त्यांचे डोळेही पाणावले.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे वडील प्रतापसिंह राणे हेसुद्धा आपल्याला मुलासमान वागणूक देत होते. आपण त्यांच्या विश्वासाला पात्र ठरूनच जनतेची सेवा केल्याचे दिगंबर कामत यावेळी म्हणाले.
माणुसकी आणि आदर महत्त्वाचा
सत्ता येते आणि जाते, परंतु, माणुसकी आणि आदर खुप महत्त्वाचा असतो. दिगंबर कामत यांच्याबद्दल आपली एक भावना आहे. त्या भावनेतूनच आपण त्यांची जाहीर माफी मागितली आहे. ते आपल्याला माफ करतील अशी आपली अपेक्षा आहे, असे आरोग्यमंत्री श्री. राणे म्हणाले. विशेष म्हणजे यावेळी आरोग्यमंत्री राणे व आमदार दिगंबर कामत यांच्यातील मैत्रीचे दर्शन यावेळी सर्वांना घडले.