For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रेडकरकडून ‘बर्च’साठी 33 खात्यांना ‘एनओसी’

03:04 PM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
रेडकरकडून ‘बर्च’साठी 33 खात्यांना ‘एनओसी’
Advertisement

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांचा गौप्यस्फोट : सुरेंदरकुमार खोसला नावे दिले ‘ना हरकत’ दाखले

Advertisement

म्हापसा : हडफडे येथील ‘बर्च’ नाईट क्लबच्या अग्नितांडवात 25 जणांचा मृत्यू झाल्यानंतर कळंगुटचे आमदार मायकल लोबो व हडफडेचे सरपंच रोशन रेडकर यांच्यामधील वादंग बरेच तापले आहे. 2020 ते 2023 या दरम्यान रोशन रेडकर यांनी स्वत:च्या  सरपंचपदाच्या कालावधीत सुरेंदरकुमार खोसला याच्या नावे तब्बल 33 खात्यांकडे पंचायतीचे ‘ना हरकत’ दाखले दिले आहेत, असा गौप्यस्फोट आमदार मायकल लोबो यांनी काल शुक्रवारी दै. तऊण भारतशी बोलताना केला आहे. हडफडेतील आगप्रकरण घडल्यानंतर पोलिसांनी सरपंच रोशन रेडकर याला मंदिरातून उचलून आणून पोलिसस्थानकात बसवून ठेवले होते. त्यानंतर पोलिसांच्या या कृतीच्या निषेधार्थ शेकडो ग्रामस्थ पोलिसस्थानकावर जमले होते. पोलिसांनी त्याला सोडल्यानंतर रेडकरने पोलिसांनी आपणास ताब्यात घेतल्याचे खापर आमदार मायकल लोबो यांच्यावर फोडले होते.

आमदार लोबोंना दिले आव्हान 

Advertisement

इतकेच नव्हे तर आमदार लोबो 2027 च्या निवडणुकीत कसे निवडून येतात, हे आपण पाहतो. तसेच कुणीही भाजपला मतदान करू नका. आरजी, काँग्रेस, आप कोणताही पक्ष असू द्या, पण भाजपला कुणीही मतदान करू नये. भाजप विरोधात मतदान करा, असे जाहीर केल्याने वाद वाढला आहे.

 लोबोंची 80 ग्रामस्थांनी मागितली माफी

मिळालेल्या माहितीनुसार त्या दिवशी सरपंच रोशन रेडकर यांच्या समर्थनात पोलिसस्थानकावर गेलेल्यांपैकी 80 नागरिकांनी आमदार मायकल लोबो यांच्या घरी जाऊन त्यांची माफी मागितल्याचे वृत्त आहे. आमच्याकडून चूक झाली, सरपंचांनी बोलाविल्याने आम्ही पोलिसस्थानकात गेलो होतो, मात्र पडद्यामागचे कारण आम्हाला माहीत नसल्याचे सांगून यापुढे अशी चूक होणार नाही, असे स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.

भाजपची नोटीस आल्यावर पाहूया : लोबो

हडफडेतील अग्नितांडवावरुन मायकल लोबो यांनी सरकारवर केलेल्या टीकेबद्दल भाजपने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितल्याप्रकरणी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, याबाबत अद्याप आपल्यास नोटीस आलेली नाही, ती आल्यावर पाहूया.

हडफडे सरपंच, माजी सचिवाच्या जामिनावर 16 रोजी सुनावणी 

हडफडेचे सरपंच रोशन रेडकर व तत्कालीन सचिव रघुवीर बागकर यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी मंगळवारी 16 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. बर्च क्लबचे परवाने आणि देखरेखीतील कथित त्रुटींची तपासणी अधिकारी करत असल्याचे समजल्यानंतर सचिव रघुवीर बागकर आणि सरपंच रोशन रेडकर यांनी आपल्याला अटक होईल, या भीतीने उत्तर गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. न्यायालयाने हणजूण पोलिसांना आपले उत्तर देण्यासाठी आणखी मुदत देऊन सुनावणी 16 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे.

रोशन रेडकरविरुद्ध अविश्वासाच्या हालचाली

आपण भाजप सोडत असल्याचेही रेडकरने सर्वांसमोर जाहीरही केले, मात्र रेडकरने आजपर्यंत आपल्या पदाचा राजीनामा दिला नसल्याचे समजते. रोशन रेडकर खरोखरच भाजप सदस्य आहे काय याची पडताळणी सुरू असल्याचे समजते. दरम्यान मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार सरपंच रोशन रेडकरवर अविश्वास ठराव आणण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या आहेत.

50हून अधिक जणांचे जबाब नोंद

‘बर्च क्लब‘ला आग लागून आठ दिवस होत आहेत. या आठ दिवसांत या घटनेशी संबंधित असलेल्या व्यक्तींचे आतापर्यंत 50 हून अधिक जबाब नोंदवण्यात आले आहेत. ज्यामध्ये अधिकारी, कामगार आणि पीडितांचाही समावेश आहे.

Advertisement
Tags :

.