संभ्रमाच्या जाळ्यात अडकले विश्वगुरु!
राजकारणात प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांनी काहीही बोलले तर त्याचा प्रभाव त्यांच्या प्रदेशात त्यातही त्यांना अपेक्षित असणाऱ्या मर्यादित भागातच होत असतो. राष्ट्रीय पक्षांचे तसे नसते. त्याच्या नेत्यांना प्रत्येक शब्द तोलून मापून बोलावा लागतो. नाही तर ‘सेल्फ गोल’ ठरलेलाच. अलीकडच्या काळात पंतप्रधानांची वक्तव्ये ही ‘सेल्फ गोल’ स्वरूपाची होत आहेत. प्रादेशिक पक्षांच्या विलीनीकरणासंदर्भात पंतप्रधान स्वत: बोलते झाले आणि शरद पवारांच्या सापळ्यात फसले. त्यामुळे शुक्रवारी नंदुरबारच्या सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्याला भविष्यात सुधारले जाण्याची शक्यता दिसत आहे. सरळ चाललेल्या राजकारणात अचानक फिरकी घेऊन पुढचा राजकारणी बाद करण्यात शरद पवार वाकबगार आहेत. ते एखादे वक्तव्य करतात, ती हमखास फिरकी असते आणि त्यात भले भले अडकतात.
शरद पवारांच्या आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाव क्षेत्रातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर पवारांचे एक वक्तव्य इंडियन एक्सप्रेसमधून प्रकाशित झाले. आपल्या मुलाखतीत काँग्रेसवर बोलताना भविष्यात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसकडे आकर्षित होतील आणि काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीनसुद्धा होतील असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्यानंतर अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आली होती. काकांच्या डावात कोणी फसू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी असे संभ्रम पसरवणारे वक्तव्य करण्याची पवारांना सवय आहे, असे बोलून इशाराही दिला होता. त्यानुसार पवार यांनी फडणवीसांच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांच्या त्या वक्तव्याचा उल्लेख नंदुरबार येथील सभेत केला. शरद पवार यांची राष्ट्रवादी अजित पवार यांच्या ‘अधिकृत’ राष्ट्रवादीत विलीन करावी. उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही नकली असून बाळासाहेब ठाकरेंच्या अस्सल शिवसेनेत त्यांनी आपली सेना विलीन करावी. चार जूननंतर काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा दोघांनी एनडीएमध्ये सामील होऊन आपले स्वप्न पूर्ण करावे असे वक्तव्य मोदी यांनी केले आहे.
शरद पवार यांनी ही आयती चालून आलेली संधी साधली आणि मोदी यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. पहिल्या तीन टप्प्यांमध्ये निवडणूक आपल्या हातातून जाऊ लागल्याचे लक्षात आल्यानंतर मोदी अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत. पंतप्रधानांना लोकांना सांगण्यासारखे मुद्दे राहिलेले नसल्याने त्यांना हिंदू मुस्लिम वाद लावावा लागतो, इतर पक्षांना नकली म्हणावे लागते, दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात. हे सगळे नैराश्यातून होत आहे...अशी टोकाची टीका पवारांनी केली आहे. तर त्यांचाच मुद्दा उचलून संजय राऊत यांनी पंतप्रधानांची झोपेवरून खिल्ली उडवली. नाना पटोले यांनी निवडणूक हातची गेल्याने मोदींनी कालपर्यंत ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांनाच एनडीएमध्ये बोलवावे लागत आहे, हा त्यांचा पराभव असल्याची टीका केली आहे.
वास्तविक मोदी यांच्या आतापर्यंतच्या कोणत्याही सभांना थेट उत्तर देता येईल असे मुद्दे ते विरोधकांच्या हाती लागू देत नव्हते. पवारांनी केलेल्या वक्तव्यासारखी चकवा देणारी वक्तव्ये ही जनतेत आणि मतदारांमध्ये नेत्यांना उघडे पाडण्यासाठी केली जातात. राज्यातील सर्वच पक्ष एका आघाडीत आणणे त्यांना कशासाठी आवश्यक वाटत असावे? 17 मे रोजी मोदी मुंबईमध्ये सभा घेत आहेत. त्यावर बोलताना उध्दव ठाकरे यांनी मोदींना कोणाचा ना कोणाचा आधार घ्यावा लागतो आणि मुंबईत ते राज ठाकरे यांचा आधार घेत आहेत. सामनातून उद्यापासून प्रसिद्ध होणाऱ्या मुलाखतीत हा मुद्दा आधीच चर्चेत आणून ठाकरे यांनीही मोदींनी आवाहन करण्यापूर्वी त्यांच्याकडून असेच वक्तव्य येईल हे जाणून मत मांडून ठेवले आहे. त्यामुळे पंतप्रधान पवारांच्या वक्तव्यात फसतील याचा अंदाज बांधून महाविकास आघाडीचे नेते आधीपासून गप्प राहिल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता यापूर्वी मोदी यांनी पवारांच्या पक्षातील फूट ही शरद पवार यांच्या कन्या प्रेमापोटी आणि शिवसेनेतील फूट ही उद्धव ठाकरे यांच्या पुत्र प्रेमापोटी पडली, त्यात भाजपचा संबंध नव्हता असे एका मुलाखतीत म्हटले होते. ती महाराष्ट्रातील प्रचाराची अत्यंत योग्य पद्धतीची सुरुवात होती. मात्र उत्तर महाराष्ट्र, मुंबई ठाणे या दोन टप्प्यांची चुरस सुरू असताना असे वक्तव्य त्यांना महागात पडू शकते. अशावेळी अचानक केलेली वक्तव्ये राजकारणात अनेकदा गेमचेंजर ठरतात.
पवारांची राष्ट्रवादी विलीन होणार?
शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसचे बळ वाढणार असले तरी त्यांचा पक्ष या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार का? हा मुद्दा मात्र भविष्यात चर्चेत राहीलच. पवारांनी अनुयायांना एक दिशा दाखवली आहे, शिवाय आपण कुठलाही निर्णय पक्षाच्या सहकाऱ्यांशी बोलल्याशिवाय घेऊ शकत नाही असे सांगून त्या वक्तव्याला तिथेच थोपवून ठेवले आहे. पूर्वी विलासराव देशमुख यांच्याकडून राष्ट्रवादीला अशी विलीनीकरणाची ऑफर भर व्यासपीठावरून दिली जायची. आता तसे धाडस करणारे नेतृत्व काँग्रेसमध्ये नाही. सध्याचे नेते या वक्तव्यानंतर सावध भूमिका घेतील. काही विरोधही करतील. दुसऱ्या दिवशी पवारांनी त्यामुळेच शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संभ्रम पसरणार नाही असा खुलासा करून ठेवला आहे. या सगळ्या घटनांकडे पाहिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक उत्तरलेल्या राष्ट्रीय नेतृत्वामुळे जी धार आणि गती आली आहे, त्याचा परिणाम प्रादेशिक शक्तीला बळकटी येण्यात होऊ शकतो. अगदी राज ठाकरे यांनाही त्याचा फायदा होईल. मात्र भाजपमधील राज्यस्तरीय नेतृत्व यामध्ये कुठेतरी पिचले जाईल असे दिसत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मिळणारे महत्त्व, पवार आणि ठाकरे यांना दिली जाणारी ऑफर या सगळ्याचा परिणाम भाजप नेते, कार्यकर्ते, संघ सेवक आणि त्याच्या मतदारावर अत्यंत विपरीत होतोय, याकडे पक्षाचे दुर्लक्ष होत आहे. ठाकरेंच्या सेनेचे निवडणुकीतील महत्त्व वाढू नये म्हणून त्यांच्या तोडीस तोड जागा एकनाथ शिंदे यांना देऊ करण्याची खेळी महाराष्ट्रात शिंदे यांना ठाकरेंच्या बरोबरीने जनाधार आहे हे दाखवण्यासाठी आहे.
शिवराज काटकर