विश्व कल्याण भवनचे अनगोळ येथे उद्घाटन
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे बाबले गल्लीत उभारणी
बेळगाव : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या अनगोळ येथील विश्व कल्याण भवनचे उद्घाटन अथणी मोटगी मठाचे श्री प्रभू चन्नबसव स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. बाबले गल्ली, अनगोळ येथे उभारण्यात आलेल्या या भवनाच्या उद्घाटनप्रसंगी ब्रह्माकुमारीचे माउंट अबू येथील विशेष कार्यकारी सचिव मृत्युंजयभाई यांच्यासह हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी, बेळगाव विभागाच्या प्रमुख राजयोगिनी अंबिका, माजी महापौर शोभा सोमनाचे, निवृत्त न्यायाधीश के. एच. पाच्छापुरे, केएलईचे डॉ. राजशेखर, उद्योजक विनायक लोकूर, नागेश अच्युत व योगेश बसवराजभाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री चन्नबसव स्वामी म्हणाले, आज संपूर्ण जगातच असंतोष, विद्वेश पाहायला मिळतो. सर्वत्र संघर्षाचे वातावरण आहे. अशा अराजकतेच्या काळामध्ये विश्व शांतीसाठी ब्रह्माकुमारी संस्थेने घेतलेले कार्य महत्त्वाचे ठरते. मृत्युंजयभाई म्हणाले, आमच्या संस्थेच्या माध्यमातून भारत घडविण्याचे काम सुरू आहे. विश्वामध्ये हिंसाचार, दुराचार, भ्रष्टाचार दूर होण्यासाठी संस्था कार्यरत आहे. नि:स्वार्थीपणे केलेल्या कार्याला ईश्वराचेच आशीर्वाद लागतात, असे प्रभू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले. प्रारंभी अनगोळ शाखेच्या ब्रह्माकुमारी विद्या यांनी स्वागत केले. याप्रसंगी सेडम येथील ब्रह्माकुमारी कला, दिल्ली येथील गिरीजा व पियुश यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.