For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीकृष्णाच्या रुपात विष्णूच्या अवतारांची आठवण होते

06:30 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
श्रीकृष्णाच्या रुपात विष्णूच्या अवतारांची आठवण होते
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, श्रीभागवत हे महाक्षेत्र असून ब्रह्मा हा मुख्य बीजधर आहे. येथे नारदाचे प्रभुत्व आहे. सुरवातीला त्याने विचित्र अशी पेरणी केली. ते बघून श्रीव्यासानी त्या पेरणीला अनुसरून सर्वत्र बंधारे घातले. त्यामुळे कल्पनेच्या पलीकडे बेसुमार पिक आले. त्यातून स्वानंदबोधाची कणसे हाती आली. त्यावर सोपस्कार करायला शुकमुनी तयार झाले. त्यावर संस्कार करून त्यांनी त्यातील भूस बाजूला काढून हरीकथेची जुळवाजुळव केली. त्यातल्या एकादश स्कंधामध्ये उद्धवच्या विनंतीवरून भगवंतांनी त्याला त्यातले दाणे काढून भरवले. अनेक युक्त्याप्रयुक्त्या करून, उद्धवाच्या निरनिराळ्या प्रश्नांना उत्तरे देऊन, तसेच जेथे उद्धवाने प्रश्न विचारले नाहीत पण अधिक स्पष्टीकरण देण्याची गरज भगवंतांना वाटली. तेथे त्यांनी त्या त्या मुद्याचे विशेष विवेचन केले आणि त्यामुळे त्यांचे सांगणे अधिकाधिक रोचक झाले. ते ऐकून उद्धव निश्चिंत आणि निर्भय झाला. भगवंतांनी उद्धवाला केलेला उपदेश सविस्तर, सोप्या भाषेत असल्यामुळे उद्धवाबरोबरच समस्त लोकांच्यावरही देवांचे अनंत उपकार झाले. त्यामुळे उद्धवाच्यामागे जे लोक पंक्तीला बसले त्यांनाही भगवंतांनी उद्धवाला वाढलेल्या पक्वान्नाच्या ताटाचा लाभ झाला. त्या पंक्तीतच ज्ञानेश्वर माउलींची भावार्थदीपिका हातात धरून, जनार्दनकृपेची माशी असलेला मी सामील झालो. खरं म्हणजे माशीला सगळेजण हाकलून लावतात पण मला कृपाप्रसाद लाभल्याने मी तृप्त झालो. जो काया, वाचा आणि मनाने अत्यंत नम्रपणे हा एकादश स्कंधाचा उपदेश ग्रहण करेल त्याचे कल्याण होईल असे जनार्दन स्वामिनी सांगितले आहे परंतु ज्याला स्वत:च्या ज्ञानाचा अभिमान आहे, जो मानसन्मानाची अपेक्षा बाळगून आहे त्याला मात्र हे एकादश स्कंधाचे मर्म न कळल्याने त्यातील ज्ञान प्राप्त होणार नाही. मात्र जो सर्वाभूती भगवदभाव पाहील त्याला मात्र एकादश स्कंधाचे मर्म सहजी लक्षात येईल. ह्याप्रमाणे श्रीभागवतक्षेत्रात परम पवित्र पिक अमाप पिकले आहे. जे साधक सर्वाभूती अत्यादर बाळगतील त्यांना ह्या ग्रंथाच्या श्रवणाने नित्यसुखाचा लाभ होईल. एकादश स्कंधाला मी शेताची उपमा दिली खरी परंतु प्रत्यक्षात ह्याला अनंत रत्नांची खाण असलेल्या समुद्राची उपमा देता येईल. जो ह्यात जितके हातपाय मारेल आणि जेव्हढा वेळ पोहायचा प्रयत्न करेल तेव्हढा सगळा वेळ सत्कारणी लागून त्याला नित्य नव्या रत्नांचा लाभ होत राहील. नाथमहाराज असं म्हणताहेत कारण आध्यात्मिक ग्रंथ साधक जितक्यावेळा वाचेल तितक्यावेळा त्यातून नित्यनवीन बोध त्याला मिळत जातो. हा प्रत्येकाचाच अनुभव असतो मग महापुराण असलेला भागवदग्रंथ त्याला अपवाद कसा असेल? हा भागवताचा एकादश स्कंध म्हणायचा खरं पण प्रत्यक्षात ही भगवंतांनी उद्धवाला सांगितलेली गीता असल्याने ह्यातील उद्धवाला उपदेश करणाऱ्या श्रीकृष्णाच्या रुपात त्याच्या अनेक अवतारांच्या रुपाची आठवण होते. उदाहरणार्थ उद्धवाच्या उद्धारासाठी तत्पर असलेल्या श्रीकृष्णामध्ये गजेंद्राचा उद्धार करण्यासाठी अत्यंत वेगाने धावलेल्या श्रीहरिच्या रुपाचा भास होतो किंवा अत्यंत अभिमानी असलेल्या हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी खांबात नृसिहरूपाने प्रकटलेल्या भक्तकैवारी कृपापूर्ण श्रीविष्णूचे रूपही ह्यातील श्रीकृष्णात दिसते. ह्या एकादश स्कंधात कृष्ण आणि उद्धव ह्यांच्यात झालेला हृदयंगम संवाद म्हणजे गंगा आणि यमुनेचा संगम असेही म्हणता येईल आणि ह्यातील ज्ञानाचा ओघ म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती ह्यांच्या त्रिवेणी संगमात गुप्त असलेली सरस्वती होय. जे ह्याचा मनापासून अभ्यास करतील त्यांना वैराग्यप्राप्ती होऊन त्यांना श्रद्धेच्या अरुणोदयात नित्य स्नान घडेल.

Advertisement
Advertisement
Tags :

.