For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इच्छा व अज्ञान माणसाला संसारात अडकवतात

06:13 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
इच्छा व अज्ञान माणसाला संसारात अडकवतात
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

आपले कर्तेकरविते आपणच आहोत हे जाणून तसेच, ईश्वर स्वत: निरिच्छपणे लीला करतात हे लक्षात घेऊन जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी मुमुक्षु कर्मे करतात. निरपेक्षतेनं कर्म करत गेल्यास कर्माचं बंधन बाधत नाही. प्रत्येक पुढील जन्मात त्याची उन्नती होत होत एक ना एक दिवस त्याचं परमात्म्याशी मिलन होतं. आत्म्याचे परमात्म्याशी मिलन होणे हा सर्वात उत्तम योग आहे आणि तो आपल्या जीवनात यावा हा श्रीगणेशगीतेचा मुख्य उद्देश आहे. त्यादृष्टीने वाटचाल करणे हे उद्दिष्ट असेल तर आपण बाप्पांना प्रिय होऊ ह्यात शंका नाही.

अर्थात हे सर्व करत असताना आपल्यावर मायेचा प्रभाव असल्याने आपला स्वार्थ आपल्या आड येत असतो. आपला स्वार्थ साधला जावा, त्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मनुष्य सदैव सावधगिरी बाळगत असतो. त्यासाठी अनावश्यक गोष्टींचा साठा करणे, अनावश्यक कामे असुदेत म्हणून करून ठेवतो अशा गोष्टी त्याच्याकडून घडत असतात. ईश्वराकडे आपल्या प्रत्येक बारीकसारीक कृत्याची नोंद असते व त्याप्रमाणे हिशोब ठेवला जातो पण हे सगळं दृष्टीआड करायला आपला स्वार्थ आपल्याला भाग पाडतो आणि तो साधण्यासाठी आपल्या हातून गैरकृत्ये घडवून आणतो. तेव्हा सतत सावध राहून आपण करत असलेलं कर्म ईश्वराला पसंत पडेल का? असा विचार करावा आणि मगच योग्य निर्णय घ्यावा. यासाठी ईश्वराचा विचार मनात सतत असायला हवा. त्यासाठीच संत मंडळी नेहमी ईश्वराला स्मरून कार्य करा असं सांगतात. एखाद्याला काही भेट द्यायची असेल तर वस्तू विकत घेताना आपण देत असलेली वस्तू त्याला नक्की आवडेल का, हा विचार मनात सतत रुंजी घालत असतो. त्याच्या आवडीनिवडी बद्दल आपल्या मनात विचार येत असतात. त्याप्रमाणे आपल्या प्रत्येक कर्माची ते करण्यापूर्वी आपण छाननी केली पाहिजे. ईश्वराची आवडनिवड लक्षात घेऊन निरपेक्षतेनं निर्णय घेऊन कर्म केलं पाहिजे.

Advertisement

हे सगळं आरशासारखं स्वच्छ असलं तरी मनुष्याने स्वार्थापायी भरकटू नये म्हणून बाप्पा कोणतं कार्य करावं कोणतं करू नये याबाबतचं सविस्तर मार्गदर्शन बाप्पा पुढील श्लोकात करत आहेत.

वासनासहितादाद्यात्संसारकारणाद्दृढात् ।

अज्ञानबन्धनाज्जन्तुर्बुद्ध्वायं मुच्यते खिलात् ।। 21 ।। अर्थ- वासना म्हणजे इच्छा आणि अज्ञान ह्या दोन गोष्टींमुळे मनुष्य संसारात अडकत असतो. ज्ञान प्राप्त झाले की, तो त्यातून मुक्त होतो.

विवरण- आपल्या पूर्वप्रारब्धानुसार आपल्या वाट्याला आलेलं कर्म निरपेक्षतेनं करणं हे आपल्या आयुष्यातलं ध्येय असलं पाहिजे. थोडक्यात कर्म म्हणजे आपल्याला नेमून दिलेलं काम होय पण ते करत असताना आपण कर्ते आहोत ह्या समजापायी आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनुष्य त्याच्या डोक्याने त्यात वाढ करून जादा कर्मे करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा वाट्याला आलेलं काम न करता भलतंच काहीतरी करत असतो. हे सर्व अकर्म या सदरात मोडतं. आपल्या वाट्याला आलेले कर्म आणि आपणहून वाढवून ठेवलेली कर्मे करत असताना त्यात यश मिळावे म्हणून भलेबुरे मार्ग चोखाळतो. ह्यातून त्याच्या खात्यावर पापपुण्य जमा होते आणि ते भोगण्यासाठी त्याचा पुनर्जन्म होत राहतो. काहीवेळा याहीपुढे जाऊन मनुष्य इतरांना त्रास देण्याच्या उद्देशाने मुद्दामहून काही कर्मे करत असतो ती विकर्म म्हणजे निषिद्ध कर्मे होत. मी तुला आता कर्म आणि विकर्म ह्याबद्दल सांगणार आहे. बऱ्याच लोकांना ह्यातील फरक माहीत नसतो. तो समजल्यावर ऋषीमुनीसुद्धा मौनात जातात.

तदकर्म च कर्मापि कथयाम्यधुना तव ।

यत्र मौनं गता मोहादृषयो बुद्धिशालिन ।। 22 ।।

अर्थ- बुद्धिमान् ऋषिना देखील जयामुळे मोह होतो त्या कर्म आणि अकर्म ह्याबद्दल तुला सांगतो.

क्रमश:

Advertisement
Tags :

.