Vari Pandharichi 2025: नदीपात्रातील सुंदर दगडी मंदिर विष्णुपद, काय सांगते अख्यायिका?
सोशल मीडियामुळे श्री विष्णुपद मंदिराचा महिमा लाखो भाविकांच्या समोर आला
By : चैतन्य उत्पात
पंढरपूर : भारताची दक्षिण काशी पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर जेवढे प्रसिद्ध आहे, तेवढेच नदीपात्रातील विष्णुपद हे पवित्र स्थान प्रसिद्ध आहे. विष्णुपद नेहमीच भाविकांना खुणावत असते. पूर्वी या मंदिरात मार्गशीर्ष महिन्याशिवाय कोणी येत नसे. मात्र, गेल्या काही वर्षात सोशल मीडियामुळे श्री विष्णुपद मंदिराचा महिमा लाखो भाविकांच्या समोर आला आहे. आषाढी वारीमध्ये याठिकाणी हजारो भाविक येऊन दर्शन घेतात.
गोपाळपूर नजीकच्या चंद्रभागा नदीच्या काठावर हे दगडी चौखांबी मंदिर आहे. मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यासह महिनाभर येथे मुक्कामाला असतात. याच मंदिरापुढे नदीपात्रात मध्यभागी नारद मुनी यांचे मंदिर आहे. नारदमुनी यांनी श्रीकृष्ण, रुक्मिणी यांचे भांडण लावल्याने देवाने भविष्यात नारद मुनीनी कुणाचे भांडण लावू नये, यासाठी पाण्यात मंदिर बांधले.
श्रीकृष्णाने स्वर्गातून पारिजातक वृक्ष आणून तो सत्यभामा देवीच्या दारात लावला. यावरुन नारदमुनी यांनी श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्यात भांडणे लावली होती. पारिजातक सत्यभामेच्या दारात लावला. याचा राग रुक्मिणीला आला आणि ती पंढरपूर येथे दिंडीरवनात रुसून आली.
याचवेळी भक्त पुंडलिक पंढरीत होते. आणि रुक्मिणी मातेस भक्त पुंडलिक आणि श्री विठ्ठल यांची भेट घडवून द्यायची होती. त्यामुळे रुक्मिणीचा हा हेतू देखील होता, अशी आख्यायिका आहे. असे म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यात श्री विठ्ठल मंदिरात नसतात तर ते विष्णुपद येथे असतात.
यामुळे पंढरपूर आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक वनभोजनासाठी विष्णुपदावर येतात. येथे श्रीकृष्णाचे देहुडाचरण म्हणजे दीड पाऊल दगडात रुतलेले आहे. येथे गायीचे खूर, बालगोपाळांची पावले उमटली असून याचे दर्शन घेतले जाते.