विष्णू वर्धन, माया उपांत्यपूर्व फेरीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे सुरू असलेल्या 29व्या फिनेस्टा खुल्या राष्ट्रीय टेनिस चॅम्पियनशीप स्पर्धेत आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत अनेकवेळा पदके मिळविणारा भारतीय टेनिसपटू विष्णू वर्धन आणि महिला टेनिसपटू माया रेवती यांनी आपली विजय घोडदौड कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.
भारताचा माजी राष्ट्रीय विजेता आणि टॉपसिडेड विष्णू वर्धनने एकेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात मणिपूरच्या बी. सेगोलसेमचा 6-3, 5-7, 6-2 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळविले. त्याच प्रमाणे महिलांच्या एकेरीतील दुसऱ्या फेरीतील सामन्यात तामिळनाडूच्या माया रेवतीने तेलंगणाच्या सौम्या रोंडेचा 6-3, 6-0 असा पराभव केला. गेल्यावर्षी या स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारी गुजरातची वैदेही चौधरीने दिल्लीच्या रिया सचदेववर 6-0, 6-0 तसेच रिया भाटीयाने झारखंडच्या के. निमाचा 6-2, 6-2 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.