मांडरेतील विषबाधाप्रकरणी व्हिसेरा फॉरेन्सिक लॅबकडे
कोल्हापूर :
मांडरे (ता. करवीर) येथील दोन सख्ख्या भावांचा विषबाधेने मंगळवारी (3 डिसेंबर) मृत्यु झाला आहे. या प्रकरणाचा करवीर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेवून तपास सुरु केला असून, मृतांच्या शरीरात कोणत्या प्रकारचे विष होते, याचा उलगडा होण्यासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली जात आहे. त्यांचा अहवाल येताच. या प्रकरणाची खरी वस्तुस्थिती आणि संशयितांचा शोध घेता येईल, अशी माहिती करवीर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली.
मुंगूस चावून दगावलेल्या कोंबडीचे मांस खाल्ल्याचे निमित्त झाल्याने, मांडरे गावातील तिघा जणांचा मृत्यू झाला. तर तिसरी व्यक्ती अत्यवस्थ आहे. या घटनेने जिह्यात खळबळ उडाली आहे. मृत पाटील पिता-पुत्रांना अन्नातून विषबाधा झाली की त्यांच्यावर कोणी विषप्रयोग केला ? याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. मंगळवारी जे दोघे जण मृत झाले आहेत. त्याचा व्हिसेरा राखीव ठेवला असून, हा व्हिसेरा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आला आहे. या तपासणी मधून मृतांच्या पोटातील विषाची माहिती पोलिसांना मिळणार आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती येणार आहे.
संशयित नातेवाइकांची चौकशी
तिघांच्या मृत्युनंतर मांडरे ग्रामस्थांनी त्याच्या नात्यातील एका विवाहितेवर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी त्या विवाहितेला ताब्यात घेवून, तिची कसून चौकशी केली. पण चौकशीतून ठोस अशी माहिती मिळाली नाही. घटना घडल्यापासून संबंधीत विवाहिता मुलीसह माहेरी राहत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.