अमेरिकेत चोरी, हिंसक कृत्य केल्यास व्हिसा होणार रद्द
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या अवैध स्थलांतरितांना देशाबाहेर काढण्याची मोहीम राबवत आहेत. याचदरम्यान भारतातील अमेरिकेच्या दूतावासाने मोठा इशारा जारी केला आहे. अमेरिकेत हल्ला, चोरी किंवा हिंसा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. याचबरोबर संबंधित व्यक्तीला पुन्हा कधीच अमेरिकेत प्रवेश दिला जाणार नसल्याचे दूतावासाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे.
अमेरिकेत हल्ला, चोरी किंवा फसवणूक केल्यास संबंधित व्हिसा धारकाला कायदेशीर समस्येला तोंड द्यावे लागेल, तसेच त्याचा व्हिसाही रद्द होऊ शकतो. अमेरिका कायदा आणि सुव्यवस्थेला महत्त्व देतो आणि विदेशी लोकांकडून अमेरिकेच्या कायद्यांचे पालन होईल अशी अपेक्षा असल्याचे दूतावासाने म्हटले. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे अवैध स्थलांतरित आणि अन्य गुन्हेगारांना अमेरिकेतून हाकलण्याची मोहीम राबवत असताना दूतावासाने हा इशारा जारी केला. तर संयुक्त राष्ट्रसंघानुसार 20 जानेवारी ते 29 एप्रिल दरम्यान 1,42,000 विदेशी लोकांना अमेरिकेतून बाहेर काढण्यात आले आहे.