विराट स्वप्न पूर्ण, आरसीबी प्रथमच चॅम्पियन
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर (आरसीबी) संघाने आयपीएल 2025 चे विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. 18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आरसीबीचे नाव आयपीएलच्या विजेत्यांच्या ट्रॉफीवर कोरले गेले. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनेक अपयश पाहिलेल्या या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज यंदा पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहोचून विजेतेपदाच्या खूप जवळ आला होता. मात्र अंतिम क्षणी आरसीबीने केलेल्या उत्कृष्ट खेळीने पंजाबचे स्वप्न भंगले.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावत 190 धावा केल्या. यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक 43 धावांची खेळी केली. यानंतर विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबला 184 धावापर्यंत मजल मारता आली. शशांक सिंगने नाबाद 61 धावांची खेळी करीत विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले पण अखेरीस पंजाबला हार पत्करावी लागली. या विजयानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी मैदानावर एकच जल्लोष केला. अर्थात, विराटसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. आयपीएलमध्ये अनेक वैयक्तिक विक्रम गाठणाऱ्या या दिग्गज खेळाडूचे संघाला चॅम्पियन बनवण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. विराटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने याआधी अनेकदा प्लेऑफ आणि फायनल गाठल्या होत्या, पण ट्रॉफी नेहमी हुलकावणी देत होती. यंदा मात्र रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने सांघिक कामगिरी करत अखेरच्या क्षणी बाजी मारली.
आरसीबी फर्स्ट टाईम चॅम्पियन
आरसीबी संघ आयपीएलच्या इतिहासातील आठवा विजेता बनला आहे. याआधी चेन्नई सुपर किंग्ज (5 वेळा), मुंबई इंडियन्स (5 वेळा), कोलकाता नाईट रायडर्स (3 वेळा), राजस्थान रॉयल्स (1 वेळा), डेक्कन चार्जर्स (1 वेळा), सनरायझर्स हैदराबाद (1 वेळा) आणि गुजरात जायंट्स (1 वेळा) चॅम्पियन बनले आहेत.