विराट मायदेशी परतला, ऋतुराज कसोटी मालिकेला मुकणार
अंगठ्याच्या दुखापतीमुळे ऋतुराजची माघार : कौटुंबिक कारणास्तव विराट सराव सामन्याला मुकणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये टी 20 आणि एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, तर कसोटी मालिकेला अद्याप सुरुवात झाली नाही. या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज गायकवाड अंगठ्याच्या दुखापतीमुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. दिग्गज फलंदाज विराट कोहली कौटुंबिक कारणास्तव मायदेशी परतला असून तो प्रिटोरियातील तीन दिवसांच्या सराव सामन्यात सहभागी होऊ शकणार नाही. कोहली 26 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या सेंच्युरियन कसोटीपूर्वी परतेल, अशी माहिती बीसीसीआयमधील सूत्रांनी दिली आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान ऋतुराज गायकवाडला दुखापत झाली होती. तो अद्याप दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्याची दुखापत बघता दोन्ही कसोटी सामन्यांपूर्वी तो बरा होण्याची शक्यता नाही. बीसीसीआयशी चर्चा केल्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. तो शनिवारपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोहम्मद शमी, इशान किशन यांच्या पाठोपाठ कसोटी मालिकेतून बाहेर पडणारा ऋतुराज तिसरा खेळाडू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहली कौटुंबिक कारणामुळे भारतात परतला आहे. तो मायदेशी का परतला याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटीआधी कोहली तेथे पोहोचेल. कोहलीने 3 दिवसांपूर्वी बीसीसीआयकडून भारतात येण्याची परवानगी घेतली होती. भारतात परतल्यामुळे तो सराव सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. दरम्यान, उभय संघात 26 डिसेंबरपासून सेंच्युरियन येथे पहिली कसोटी खेळवण्यात येणार आहे.