विराट कोहली, रोहित शर्माचा खडतर सराव
वृत्तसंस्था/पर्थ
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून उभय संघात वनडे मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवार दि. 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने सराव सत्रामध्ये बराच वेळ खडतर परिश्रम घेतले. या संघातील ज्येष्ठ खेळाडू विराट कोहली आणि माजी कर्णधार रोहित शर्मा यांनी गुरुवारी शारीरिक व्यायाम आणि फलंदाजीचा बराच वेळ सराव केला.
या मालिकेत रोहित आणि विराट यांच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंनी आपला शेवटचा सामना चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळला होता. त्यानंतर क्रिकेटच्या वनडे प्रकारात ते आता पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. विराट आणि रोहित यांनी सुमारे तासभर नेटमध्ये फलंदाजीचा सराव केला. भारतीय क्रिकेट संघाचे येथे दोन टप्प्यात बुधवारी आणि गुरुवारी आगमन झाले.
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे मालिका आणि त्यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. टी-20 मालिकेला 29 ऑक्टोबरपासून प्रारंभ होईल. गुरुवारी पर्थ येथे सरावसत्रामध्ये प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीरने आपल्या उपस्थितीत रोहितला मार्गदर्शन केले. चालु वर्षाच्या प्रारंभी रोहित आणि विराट यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली होती. तसेच त्यांनी गेल्या वर्षी आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्यानंतर या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंनी टी-20 प्रकारालाही निरोप दिला.
आता ते वनडे क्रिकेटपुरतेच मर्यादीत राहिले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हे दोन महान खेळाडू या मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना दिसतील. दरम्यान, या आगामी मालिकेसाठी त्यांची तंदुरुस्ती आणि फॉर्म यावर बरेच काही अवलंबून राहील. कोहलीने गुरुवारी सराव सत्रात गोलंदाज प्रशिक्षक मॉर्नी मॉर्कलशी चर्चा केली. तसेच अर्शदीप सिंगसमवेत त्याने काही वेळ घालविला. आता भारतीय संघ शुक्रवारी आणि शनिवारी या ठिकाणी दोन सत्रामध्ये सराव करणार आहे.