आयसीसी वनडे रॅकिंगमध्ये विराट कोहली चौथ्या स्थानी
वृत्तसंस्था / दुबई
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवशीय सामन्यात मॅचविनिंग शतक झळकावून आयसीसी रॅकिंगमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला.
कोहलीने 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये 52 वे शतक केले. 120 चेंडूत 135 धावा केल्याने भारताने द. आफ्रिकेवर 17 धावांनी विजय मिळविला. 37 वर्षीय फलंदाजाचे आता 751 रँकिंग गुण आहेत आणि तो भारताचा माजी कर्णधार रोहीत शर्मा (783), न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल (766 ) आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रन (764) यांच्यापेक्षा मागे आहे. कोहलीने भारताचा वनडे कर्णधार शुभमन गिलला मागे टाकले. जो द. आफ्रिकेविरुद्धच्या चालू तीन सामन्यांच्या मालिकेत मानेच्या दुखापतीमुळे खेळू न शकल्याने पाचव्या क्रमांकावर आला होता. भारताच्या अलिकडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीतून सावरणारा श्रेयस अय्यरही नवव्या स्थानावर कायम आहे. दरम्यान द. आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चार बळी घेत डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने एका स्थानाची प्रगती करत सहाव्या स्थानावर झेप घेतली.
कसोटी फलंदाजांच्या यादीत, भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल 9 व्या स्थानावर कायम राहिला. तर गिल एका स्थानाने 12 व्या स्थानावर घसला. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही 12 व्या स्थानावरुन 14 व्या स्थानावर घसरला. कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह 879 गुणांसह अव्वल स्थानावर राहिला. जो न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री (846) पेक्षा खूपच मागे आहे.
तथापि, द. आफ्रिकाविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेतील माफक कामगिरमुळे वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (11 व्या स्थानावरुन 13 व्या स्थानावर) आणि कुलदीप 13 व्या स्थानावरुन 15 व्या स्थानावर) यांच्या क्रमवारीवर परिणाम झाला. टी-20 यादीत अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती यांनी आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.