विराट कोहलीलाही कसोटीतून निवृत्तीचे वेध
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आपल्या इराद्यांबद्दल दिली कल्पना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या त्याच्या इराद्याबद्दल भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कळवले आहे, असे ‘ईएसपीएनक्रिकइन्फो’ने शनिवारी वृत्त दिले आहे. फलंदाज आणि त्याचा दीर्घकाळचा सहकारी रोहित शर्माने कसोटीत निवृत्ती जाहीर केल्यानंतर दोन दिवसांनी आणि 20 जूनपासून हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या इंग्लंडविऊद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसह ‘आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27’ सुरू होण्यास एक महिना असताना हे वृत्त आले आहे.
‘ईएसपीएनक्रिकइन्फो’नुसार, गेला महिनाभर विराट मंडळाशी अशा प्रकारची चर्चा करत आहे. जर विराट खरोखरच निवृत्त झाला, तर तो त्याच्या 14 वर्षांच्या शानदार कसोटी कारकिर्दीचा शेवट असेल, ज्यादरम्यान त्याने 123 कसोटी सामन्यांमध्ये 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत आणि 30 शतके आहेत. तो भारताचा सर्वांत यशस्वी कसोटी कर्णधार देखील असून त्याने 68 पैकी 40 कसोटी जिंकल्या आहेत.
पण गेल्या वर्षी त्याने 10 कसोटी सामन्यांमध्ये 22.47 च्या धक्कादायक सरासरीने फक्त 382 धावा केल्या आणि 19 डावांमध्ये फक्त एक शतक आणि अर्धशतक त्याला झळकावता आले. त्याचा शेवटचा कसोटी सामना नोव्हेंबर ते जानेवारादरम्यान झालेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत झाला. त्या मालिकेत त्याने नऊ डावांमध्ये 23.75 च्या सरासरीने फक्त 190 धावा केल्या. पर्थमधील त्याचे शतक हे एकच वैशिष्ट्या राहिले. जुलै, 2023 नंतरचे हे त्याचे पहिले शतक होते. जुलै, 2023 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविऊद्ध त्याने शतक झळकावले होते. तसेच 2023 च्या सुऊवातीला अहमदाबाद येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान ऑस्ट्रेलियाविऊद्ध शतक झळकावल्यानंतर त्याला अद्याप घरच्या मैदानावर शतक नोंदवता आलेले नाही.
विराटच्या फॉर्ममध्ये घसरण होत असली, तरी मिळालेल्या माहितीनुसार, संघ व्यवस्थापन आणि निवड समितीला इंग्लंड दौऱ्यात त्याचा अनुभव हवा आहे. तिथे रोहितने निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारताला नवीन कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे. युवा फलंदाज शुभमन गिल हा कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार आहे. रोहितव्यतिरिक्त रविचंद्रन अश्विनने गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यभागी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मधल्या फळीतील अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा काही काळापासून संघात नसल्याने आणि दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटमधून बाहेर राहावे लागल्यानंतर वरिष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फॉर्ममध्ये घसरण झालेली असल्यामुळे अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यासह विराट हा एकमेव वरिष्ठ खेळाडू राहिलेला आहे.
विराट इंग्लंडमध्ये 17 कसोटी सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याने 33.21 च्या सरासरीने 1,096 धावा केल्या आहेत. या 33 डावांमध्ये दोन शतके आणि पाच अर्धशतके असून 149 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.