For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विराट भारतातील मौल्यवान सेलिब्रिटी

06:05 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
विराट भारतातील मौल्यवान सेलिब्रिटी
Advertisement

शाहरुख खानसह रणवीर सिंग, महेंद्रसिंग धोनी, सचिनला टाकले मागे

Advertisement

वृत्तसंस्था /मुंबई

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शैलीदार फलंदाजीने जगभरातील चाहत्यावर अधिराज्य गाजवले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्याने अनेक विक्रम रचले आहेत तर अनेक विक्रम मोडले देखील आहेत. क्रिकेटशिवाय कोहली त्याच्या मैदानाबाहेरील लोकप्रियतेसाठी देखील ओळखला जातो. यावेळी विराटने सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत मोठी कामगिरी केली आहे. त्यानं देशातील अनेक बड्या स्टार्सना मागे टाकले आहे. सध्याच्या घडीला विराट अभिनेता रणवीर सिंग आणि शाहरुख खान, सलमान खान, महानायक अमिताभ बच्चन, क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजांना मागे टाकत भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

Advertisement

अलीकडे वेस्ट इंडिज व अमेरिकेत झालेला टी 20 वर्ल्डकप विराटसाठी फारसा चांगला ठरला नाही, पण तरीही त्याच्या जागतिक ब्रँड व्हॅल्यूवर कोणताही परिणाम झालेला नाही. यंदाच्या वर्षी कोहलीची ब्रँड मूल्य सुमारे 29 टक्क्यांनी वाढून 1900 कोटी रुपयांपर्यंत (227.9 दशलक्ष डॉलर्स) पोहोचली आहे. जागतिक स्तरावर सूत्रांनी देखील याला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, सोशल मीडियाची ताकद, ट्रेंडमध्ये राहणे, करिअरमधील यश यावरुन सेलिब्रिटीची ब्रँड व्हॅल्यू मोजली जाते.

अनेक कंपन्यांचा ब्रॅड अॅम्बेसिडर, सोशल मीडियावरही कोहलीची हवा

सध्याच्या घडीला विराट अनेक मोठ्या कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. स्टॉक ग्रोच्या माहितीनुसार, सध्या विराट ची नेट वर्थ ही 1050 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये सामन्यांची फी, सोशल मीडिया पोस्ट, ब्रँडच्या जाहिराती, स्थावर मालमत्ता, गाड्या, स्वत:चे व्यवसाय व गुंतवणूक अशा विविध रूपातील आर्थिक स्रोतांचा समावेश आहे. कोहली एका जाहिरातीसाठी 7.5 कोटी ते 10 कोटी रुपये आकारतो. याशिवाय त्याच्या एका इस्टाग्राम पोस्टसाठी सुमारे 8.9 कोटी रुपये घेतो तर एका ट्विटसाठी तो करोडो रुपये घेत आहे. या सगळ्यांमुळेच त्याची ब्रँड व्हॅल्यू जास्त आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी विराटच्या ब्रँड व्हॅल्यू सातत्याने वाढ होत आहे. विराट आता श्रीलंका दौऱ्यात वनडे मालिकेत खेळणार आहे. टी 20 वर्ल्डकपमध्ये भलेही तो अपयशी ठरला असला तरी त्याचा फिटनेस, त्याची कामगिरी आजही सर्वोत्तम अशी आहे. यामुळे आगामी काळात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो चांगली कामगिरी करेल, यात शंकाच नाही.

सचिन, धोनीची घसरण, रणवीर सिंग दुसऱ्या स्थानी

सेलिब्रिटी व्हॅल्यूच्या यादीत अभिनेता रणवीर सिंह 203.1 दशलक्ष डॉलर ब्रँड व्हॅल्यूसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. शाहरुख खान 120.7 दशलक्ष डॉलर्सच्या ब्रँड व्हॅल्यूसह तिसऱ्या स्थानी आहे. याशिवाय, अक्षय कुमार 111.7 दशलक्ष डॉलर्ससह चौथ्या स्थानी, आलिया भट्ट 101.1 दशलक्ष डॉलर्ससह पाचव्या स्थानी आहे. तसेच या यादीत महेंद्रसिंग धोनी सातव्या, सचिन तेंडुलकर आठव्या, अमिताभ बच्चन नवव्या आणि सलमान खान दहाव्या क्रमांकावर आहे. विराट, सचिन व धोनी यांच्या जवळपास देशातील एकही खेळाडू नाही, हे विशेष.

Advertisement
Tags :

.