For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशिया चषक : भारतीय महिलांचा विजयारंभ

06:10 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
आशिया चषक   भारतीय महिलांचा विजयारंभ
Advertisement

पहिल्या सामन्यात पाकवर 7 गड्यांनी मात, सामनावीर दीप्तीचे 3 बळी, रेणुका,पूजा, श्रेयांकाचा प्रभावी मारा

Advertisement

वृत्तसंस्था /ग्रोस

भेदक गोलंदाजी, शेफाली वर्मा व स्मृती मानधना यांनी नोंदवलेली आक्रमक अर्धशतकी भागीदाच्या जोरावर भारतीय महिला संघाने पाकिस्तान महिला संघावर 35 चेंडू बाकी ठेवत 7 गड्यांनी दणदणीत मात करीत आशिया चषक महिला टी-20 स्पर्धेत विजयी सलामी दिली. 20 धावांत 3 बळी टिपणाऱ्या दीप्ती शर्माला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला. पाकने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी निवडली. पण दीप्ती शर्मा, रेणुका सिंग ठाकुर, पूजा वस्त्रकर, श्रेयांका पाटील यांच्या भेदक माऱ्यासमोर पाकचा डाव 19.2 षटकांत 108 धावांत आटोपला. त्यानंतर या माफक आव्हानाचा पाठलाग करताना शेफाली व स्मृती यांनी आक्रमक सुरुवात करीत केवळ 57 चेंडू 85 धावांची बरसात करीत विजय सोपा केला.

Advertisement

स्मृती 31 चेंडूत 45 धावा काढून बाद झाली. आपल्या खेळीत तिने 9 चौकार मारले. संघाने शतकी मजल मारली त्यावेळी शेफालीही 29 चेंडूत 40 धावा काढून बाद झाली. तिने 6 चौकार, एक षटकार मारला. डी. हेमलतानेही उत्तुंग फटका मारण्याच्या नादात झेल दिल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत व जेमिमा रॉड्रिग्ज यांनी विजयाचे सोपस्कार 15 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर पूर्ण केले. हरमन 5, जेमिमा 3 धावावर नाबाद राहिला. पाकच्या सईदा अरूब शहाने 2, नशरा संधूने एक बळ मिळविला. भारत व नेपाळ यांनी एकेक विजय मिळवित प्रत्येकी 2 गुण मिळविले आहेत भारत पहिल्या तर नेपाळ दुसऱ्या स्थानावर आहे. भारताची पुढील लढत संयुक्त अरब अमिरातशी रविवारी 21 रोजी होणार आहे. आज शनिवारी मलेशिया व थायलंड (दु. 1.30 वा) आणि लंका व बांगलादेश (सायं.6.30) असे सामने होतील.

भारताचा भेदक मारा

प्रारंभी, पाकिस्तानची कर्णधार निदा दारने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण तिचा हा निर्णय चांगलाच चुकीचा ठरला. दिप्ती शर्मा, रेणुका सिंग, पूजा वस्त्राकार आणि श्रेयंका पाटील यांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा डाव 108 धावात आटोपला. पाकिस्तानच्या एकाही महिला फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. भारताच्या पूजा वस्त्रकारने डावातील दुसऱ्याच षटकात गुल फेरोझाला पाच धावांवर बाद केले आणि पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतर पूजाने मुनीबा अलीला आपल्या पुढच्याच षटकात बाद केले, यामुळे पाकिस्तानची 2 बाद 26 अशी स्थिती झाली होती. अमीन हिने 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली, पण त्यासाठी 35 चेंडू घालवले. अमीनला रेणुकाने बाद केले. आलिया 6 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. रेणुकाने त्यानंतर इराम जावेदलाही बाद केले, जावेदला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या संघाची 6 बाद 61 अशी दयनीय अवस्था झाली होती.

पूजा आणि रेणुकानंतर दीप्ती शर्मानेही पाकिस्तानला दुहेरी धक्के दिले. दीप्तीने पाकिस्तानची कर्णधार निदा दारला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. निदाला आठ धावा करता आल्या. त्यानंतर दीप्तीने भारतासाठी धोकादायक ठरत चाललेल्या तुबा हसनला बाद केले. तुबाने 3 चौकारासह 22 धावा केल्या. यानंतर फातिमा सनाने 16 चेंडूत नाबाद 22 धावांची खेळी करत संघाला शतकी मजल मारुन दिली. फातिमाला इतर खेळाडूंची मात्र साथ मिळाली नाही. भारताकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक 3 गडी बाद केले तर रेणुका, पूजा व श्रेयंका यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान 19.2 षटकांत सर्वबाद 108 (मुनीबा अली 11, सिद्रा अमीन 25, तुबा हसन 22, फातिमा सना नाबाद 22, दीप्ती शर्मा 20 धावांत 3 बळी, रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार व श्रेयंका पाटील प्रत्येकी दोन बळी).

भारत : 14.1 षटकांत 3 बाद 109 : शेफाली वर्मा 29 चेंडूत 40, स्मृती मानधना 31 चेंडूत 45, डी. हेमलता 11 चेंडूत 14, हरमनप्रीत कौर नाबाद 5, जेमिमा रॉड्रिग्ज नाबाद 3, अवांतर 2. सईदा अरूब शहा 2-9, नशरा संधू 1-20.

Advertisement
Tags :

.