अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये हिंसक निदर्शने
वृत्तसंस्था/ लॉस एंजिलिस
अमेरिकेच्या लॉस एंजिलिसमध्ये अवैध स्थलांतरितांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांना हिंसक रुप मिळाले आहे. निदर्शकांनी रविवारीपोलिसांवर दगडफेक केली. याचबरोबर निदर्शकांनी सुरक्षा दल तसेच इमिग्रेशन अँड कस्टम्स इन्फोर्समेंटवर (आयसीई) पेट्रोलबॉम्ब फेकले आहेत. तसेच मेक्सिकोचा ध्वज हातात घेत ‘आयसीईने लॉस एंजिलिसमधून बाहेर पडावे’ अशा घोषणा दिल्या आहेत.
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 2 हजार नॅशनल गार्ड्सना शहरात पाठविले आहे. लॉस एंजिलिसमध्ये 6-7 जून रोजी प्रशासनाने अवैध स्थलांतरितांच्या विरोधात मोहीम राबविली होती. दरदिनी सुमारे 1600 अवैध स्थलांतरितांना पकडले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर होमलँड सिक्युरिटी विभागाने 1 हजार निदर्शकांनी एका संघीय भवनाला घेरून अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचे सांगितले आहे.
ट्रम्प यांनी कायदा सुव्यवस्था राखू न शकलेल्या प्रांतीय प्रशासनाला इशारा दिला आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि लॉस एंजिलिसच्या महापौर करेन बास स्वत:ची जबाबदारी पार पाडू शकत नसल्यास संघीय प्रशासन दंगल अन् लुटपाट रोखण्याची जबाबदारी हातात घेणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर न्यूसम यांनी प्रांतात नॅशनल गार्ड्स तैनात करणारा निर्णय तणाव वाढविण्यासाठी घेण्यात आल्याचा आरोप केला
आयसीईला टार्गेट
ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांना विक्रमी संख्येत निर्वासित करणे आणि अमेरिका-मेक्सिको सीमा बंद करण्याचे आश्वासन दिले आहे. व्हाइट हाउसने आयसीईला प्रतिदिन कमीतकमी 3 हजार अवैध स्थलांतरितांना ताब्यात घेण्याचे लक्ष्य दिले आहे. तर लॉस एंजिलिस शहरातील निदर्शने सार्वभौमत्वाच्या विरोधातील असल्याचा आरोप व्हाइट हाउसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर यांनी केला आहे.