बांगला देशात हिंसक निदर्शने
सरकारकडून विद्यापीठ, महाविद्यालय बंद
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधात तीव्र निदर्शने होत आहेत. हजारो विद्यार्थ्यांनी रस्त्यांवर उतरत आरक्षण संपुष्टात आणण्याची मागणी केली आहे. आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेल्या या निदर्शनांनी आता हिंसक वळण घेतले आहे. पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 100 हून अधिक निदर्शक जखमी झाले आहेत.
स्थिती अत्यंत बिघडल्याने ढाका समवेत बांगलादेशच्या विविध शहरांमधील शाळा-महाविद्यालये तसेच मदरसे बंद करावे लागले आहेत. बांगलादेशात शासकीय नोकऱ्यांमध्ये असलेल्या आरक्षणाच्या विरोधात अनेक आठवड्यांपासून निदर्शने सुरू आहेत. 1971 च्या मुक्तिसंग्रामात भाग घेणाऱ्या स्वातंत्र्यसेनानींच्या कुटुंबातील सदस्यांसाठी बांगलादेशात 30 टक्के आरक्षण आहे.
या आरक्षणाच्या विरोधात विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे. एकूण 17 कोटी लोकंपैकी सुमारे 3.2 बांगलादेशी नागरिक रोजगारापासून वंचित आहेत. पंतप्रधान शेख हसीना यांनी प्रकरण न्यायालयासमोर प्रविष्ठ असल्याचे सांगत निदर्शकांच्या मागण्या पूर्ण करण्यास नकार दिला आहे. याचदरम्यान आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना ‘रझाकार’ ठरविण्यात आले आहे. हा शब्द 1971 च्या युद्धादरम्यान पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने लढणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो.
रबरी गोळ्यांचा वापर
आरक्षणाच्या विरोधात रस्त्यांवर उतरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्तारुढ अवामी लीग पक्षाच्या सदस्यांसोबत संघर्ष झाला आहे. पोलिसांनी निदर्शकांना पांगविण्यासाठी रबरी गोळ्या आणि अश्रूधूराचा वापर केला आहे. मंगळवारी झालेल्या झटापटीत किमान 3 विद्यार्थ्यांसोबत सहा जण मारले गेले आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी देशभरातील विद्यापीठ परिसरांमध्ये बॉर्डर ऑफ बांगलादेश या सुरक्षा दलासोबत दंगलविरोधी पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.