पाकिस्तानात इम्रान समर्थकांची हिंसक निदर्शने
6 जवानांना चिरडून केले ठार : 100 हून अधिक जखमी : निदर्शकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या मुक्ततेच्या मागणीवरून सुरू झालेली निदर्शने आता हिंसक ठरली आहेत. इम्रान खान यांचे हजारो समर्थक इस्लामाबादमध्ये शिरले आहेत. तर सैन्याने शिपिंग कंटेनर ठेवून राजधानीच्या दिशेने येणाऱ्या महामार्गावरील वाहतूक रोखली होती. परंतु निदर्शकांनी लिफ्टिंग मशीन आणि अनेक अवजड यंत्रसामग्रीच्या मदतीने बॅरिकेड्स तोडले आहेत.
निदर्शकांनी महामार्गावर तैनात जवानांवर वाहने चढविली आहेत. यामुळे 4 सैनिक आणि 2 पोलीस मारले गेले आहेत. तर घटनेत 5 सैनिक आणि 2 पोलीस जखमी झाले आहेत. हिंसेत आतापर्यंत 100 हून अधिक पोलीस जखमी झाले असून यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. हिंसक निदर्शनांमध्ये पक्षाचे कार्यकर्तेही जखमी झाल्याचा दावा इम्रान खान यांच्या गटाकडून करण्यात आला आहे.
हिंसेवर नियंत्रण मिळविण्यासाठी राजधानी इस्लामाबादमध्ये कलम 245 लागू करण्यात आले आहे. तर निदर्शकांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचा आदेश देण्यात आला आहे. पाकिस्तानी सैन्याला कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कुठल्याही भागात संचारबंदी लागू करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
डी चौकात पोहोचण्याचा प्रयत्न
खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांचा ताफा रविवारी इस्लामाबादच्या दिशेने निघाला होता. इस्लामाबादमधील डी चौक येथे पोहोचून तेथे धरणे आंदोलन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. डी चौक हा भाग इस्लामाबादमधील सर्वात हायप्रोफाइल आहे. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, संसद भवन आणि सर्वोच्च न्यायालय देखील याच भागात आहे. या भागात निदर्शकांना घुसण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तर प्रसारमाध्यम प्रतिनिधींना या भागापासून दूर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
मर्यादा ओलांडू नका : गृहमंत्री
निदर्शकांनी अतिसुरक्षा प्राप्त क्षेत्रात शिरण्याचा प्रयत्न केला तर त्यांना परिणाम भोगावे लागतील. हा भाग पूर्वीच संवेदनशील आहे, कारण बेलारुसचे अध्यक्ष अलेक्झेंडर लुकाशेंको हे अधिकृत दौऱ्यावर इस्लामाबादमध्ये पोहोचले आहेत. निदर्शकांनी डी चौकऐवजी इस्लामाबादमधील संगजानी भागात आंदोलन करावे. सरकारला कठोर भूमिका घ्यावी लागेल असे कुठलेही पाऊल निदर्शकांनी उचलू नये. निदर्शकांनी मर्यादा ओलांडली तर आम्ही कुठलेही पाऊल उचलण्यास हयगय करणार नाही, असे पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी म्हटले आहे. बुशरा बीबी या पाकिस्तानात आग लावत आहेत. त्या स्वत:च्या पतीच्या मुक्ततेसाठी पश्तूनांना भडकवत असल्याचा आरोप पंजाब प्रांताच्या मंत्री आजमा बुखारी यांनी केला आहे.
इम्रान यांच्या मुक्ततेपर्यंत निदर्शने
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जवानांच्या मृत्यूवर नाराजी व्यक्त करत गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांना कठोर शिक्षा मिळवून दिली जाणार असल्याचे म्हटले आहे. शांततापूर्ण विरोधाच्या नावावर सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे निंदनीय असल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे. तर बुशरा बीबी यांनी डी चौकऐवजी अन्य कुठल्याही जागी आंदोलन करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. इम्रान खान यांची जोवर मुक्तता होत नाही तोवर लढत राहणार आहे. ही केवळ इम्रान खान यांची लढाई नसून देशाची लढाई असल्याचे त्या म्हणाल्या. इम्रान खान हे 200 पेक्षा अधिक गुन्ह्यांप्रकरणी रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात कैद आहेत. इस्लामाबादच्या स्थानिक न्यायालयाने नजराणा प्रकरणी त्यांना दोषी ठरविले आहे.