भारतीय-बांगलादेशी मौलानांच्या समर्थकांमध्ये हिंसक झटापट, 4 जण ठार
ढाका : बांगलादेशची राजधानी ढाका येथून 40 किलोमीटर अंतरावरील टोंगी येथे इज्तामच्या आयोजनावरून मौलानांच्या दोन गटांमध्ये संघर्ष झाला आहे. या संघर्षात भारतातील मौलाना साद आणि बांगलादेशातील मौलान जुबैर यांच्या समर्थकांमध्ये हिंसक झटापट झाली. या मारहाणीत 4 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जण जखमी झाले आहेत. प्रशासनाने परिसरात जमावबंदी लागू करत सैन्य तैनात केले आहे. टोंगीमधील संघर्षात जखमी झालेल्या लोकांना ढाका येथील वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या रुग्णालयात देखील दोन्ही गटांमध्ये झटापट झाली आहे. 4 जणांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा नोंद केल्याची माहिती बांगलादेशच्या अंतरिम सरकारमधील गृहमंत्री मोहम्मद जहांगीर आलम यांनी दिली आहे.
मौलाना साद यांचे समर्थक शुक्रवारपासून टोंगी मैदानात 5 दिवसीय इज्तिमा आयोजित करू इच्छित होते. तर मौलाना जुबैर यांचे समर्थक त्यांना इज्तिमा आयोजित करण्यापासून रोखू पाहत होते. याचमुळे जुबैर यांच्या समर्थकांनी मैदानावर कब्जा केला होता. मौलाना साद यांचे समर्थक मैदानात पोहोचल्यावर झटापट सुरू झाली. माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यापासून जुबैर समर्थक दोन टप्प्यांमध्ये होणारी इज्तिमा एकाच टप्प्यात आयोजित करण्याची मागणी करत आहेत. हसीना यांच्या पक्षाने मुस्लिमांमध्ये फूट पाडण्यासाठी इज्तिमा दोन टप्प्यांमध्ये सुरू केली होती असा आरोप जुबैर समर्थकांचा आहे. तसेच जुबैर समर्थकांनी मौलाना साद यांच्या समर्थकांवर भारताचे हस्तक असल्याचा आरोप केला आहे. साद यांच्या समर्थकांच्या विरोधात ऑक्टोबर महिन्यापासूनच मोर्चे काढले जात आहेत.