परिवर्तन घडविण्यासाठी हिंसेची जरुरी नाही
बुलकमध्ये प्राचार्य मेणसे यांचे प्रतिपादन
बेळगाव : शांततामय मार्गाने परिवर्तन घडवून आणणे शक्य आहे, हे या देशात अनेक वेळा दिसून आले आहे. त्यासाठी हिंसेची जरुरी नाही. ज्याचा लोकशाहीवर विश्वास नाही आणि बंदुकीच्या नळीतूनच सत्ता मिळवता येते अशी ज्यांची विचारसरणी आहे अशा नक्षलींच्या मार्गावर आमचा विश्वास नाही. आमचा त्यांना पाठिंबा तर नाहीच पण विरोधही आहे, असे प्रतिपादन प्राचार्य आनंद मेणसे यांनी केले. लोकमान्य ग्रंथालयप्रणित बुक लव्हर्स क्लबतर्फे आयोजित ‘मी नक्षलवादी का झालो नाही’ या विषयावर ते बोलत होते. बलाढ्या सत्तेविरुद्ध आधुनिक शस्त्रांशिवाय लढा यशस्वी होऊ शकत नाही. प्रत्येकाने आपल्या ताकदीची झेप आणि आपल्यातील उणीवा ओळखल्या पाहिजेत. ही जाणीव सर्वप्रथम महात्मा गांधीजींना झाली. म्हणून त्यांनी सत्याग्रहाचे शस्त्र उपसले आणि ते यशस्वी करून दाखविले. सत्याग्रहाची ताकद स्वातंत्र्यलढ्यात, आणीबाणीत, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत व गोवा मुक्ती आंदोलनात तसेच अलीकडच्या शेती सुधारणा कायद्याविरोधात सिद्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी लोकमान्य ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष जगदीश कुंटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पुस्तक भेट देऊन प्राचार्य मेणसे यांचा सन्मान करण्यात आला.