उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार
बहराईच येथे 1 ठार, अनेक घरे-दुकाने भस्मसात
वृत्तसंस्था / लखनौ, कोलकाता
उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या काही भागांमध्ये दुर्गादेवी विसर्जनाच्या मिरवणुकांवर दगडफेक करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेशातील बहाराईच येथे जमावाने मारहाण करून गोळीबार केल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने अनेक दुकाने आणि घरांना आगी लावल्या. पोलिसांनी 30 जणांना अटक केली आहे.
पश्चिम बंगालमधील हावडा शहरात दुर्गामातेच्या मंडपात लावलेल्या एका चित्राला दुसऱ्या समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतल्याने दंगल घडली आहे. या चित्रामुळे आमच्या भावना दुखावल्याचा आरोप एका समाजाच्या लोकांनी केला. नंतर या समाजाच्या काही लोकांनी विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली. दोन जमावांच्या संघर्षात अनेक घरे आणि दुकाने यांना आगी लावण्यात आल्या.
युवकाला मारहाण
बहराईचमध्ये गोपाल मिश्रा नामक युवकाचा मृत्यू दुसऱ्या जमातीच्या लोकांच्या मारहाणीत झाल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला. मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत, असे मृताच्या मातापित्यांनी स्पष्ट केले. अखेर स्थानिक नेत्यांनी मध्यस्थी केल्याने अंत्यसंस्कार करण्यात आले. दुर्गाविसर्जन मिरवणूक एका विशिष्ट भागातून जात असताना तिच्यावर दगडफेक करण्यात आल्याने या मिरवणुकीतील युवकांची दुसऱ्या समाजातील लोकांशी झटापट झाली. त्यातून या युवकाची हत्या करण्यात आली. त्यानंतर उसळलेल्या जनक्षोभात अनेक दुकाने आणि घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
इंटरनेट बंद
दंगल भडकल्यानंतर प्रशासनाने या भागातील इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच काही भागांमध्ये संचारबंदी घोषित करण्यात आली. काही ठिकाणी लाठीमारही करण्यात आला. सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून या युवकाच्या मारेकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत काही संशयितांना अटक करण्यात आली असून पुढील तपास होत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हावडामध्येही संचारबंदी
पश्चिम बंगालमधील हावडा येथे हिंसाचार झाल्यानंतर काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येथे दोन जमावांच्या संघर्षात सार्वजनिक मालमत्तेची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे वृत्त आहे. दुर्गाविसर्जन मिरवणुकीत एका चित्रावरुन दोन समाजांमध्ये वाद झाला. एका समाजाने दुसऱ्या समाजातील काही व्यक्तींच्या विरोधात तक्रार सादर केली. त्यामुळे पुन्हा तणाव निर्माण झाला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.