पाकिस्तानात हिंसा, इंटरनेट सेवा बंद
मुनीर यांच्या अमेरिकाधार्जिणे धोरणाला टीएलपीचा विरोध
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानच्या लाहोरसमवेत अनेक शहरांमध्ये स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. पोलीस आणि इस्लामिक कट्टरवादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’ (टीएलपी)च्या समर्थकांदरम्यान लाहोरमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर अनेक ठिकाणांवरील इंटरनेट सेवा रोखण्यात आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा प्लॅनचे पाकिस्तान सरकारने समर्थन केल्याच्या विरोधात ही संघटना रस्त्यावर उतरली आहे. टीएलपी समर्थकांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सैन्यप्रमुख आसीम मुनीर विरोधात घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करत लाठीमार केला आहे.
लाहोरमध्ये पंजाब पोलिसांनी टीएलपी समर्थकांवर गोळीबार केला असून यात अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर शहरातील तणाव वाढला असून टीएलपी समर्थक भडकले आहेत. पोलिसांनी टीएलपी प्रमुख साद हुसैन रिझवीला अटक करण्यासाठी संघटनेच्या मुख्यालयावर छापा टाकला होता. रिझवीला अटक करण्यात आल्यावर पाकिस्तानच्या अनेक भागांमध्ये हिंसक निदर्शने सुरू झाली आहेत. गाझा कराराला पाश्चिमात्य शक्ती, खासकरून अमेरिकेचे समर्थन प्राप्त असून तो इस्रायलच्या बाजूने असल्याचा आरोप टीएलपीने केला आहे. हा करार म्हणजे गाझासोबत विश्वासघात असल्याचा दावाही संघटनेने केला आहे.