भारताच्या विजयानंतर मध्यप्रदेशमध्ये हिंसाचार
सीसीटीव्हीद्वारे दंगलखोरांची पटली ओळख, 13 जण ताब्यात
वृत्तसंस्था/ महू
क्रिकेट चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयानंतर जल्लोष करताना मध्यप्रदेशातील इंदूरजवळील महू येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. महू येथील जामा मशिदीजवळ रविवारी रात्री दोन समुदाय आमने-सामने आल्यानंतर दगडफेक झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने हल्लेखोरांनी तोडफोड सुरू केली. परिसरातील दुकानांना आग लावण्यात आली आणि काही वाहने जळून खाक झाली. या हिंसाचारप्रकरणी आतापर्यंत 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, दगडफेकीच्या निषेधार्थ हिंदू जागरण मंचच्या लोकांनी आज बाजारपेठ बंदचे आवाहन केले होते.
विजयी रॅली एका मशिदीजवळ पोहोचताच काही समाजकंटकांनी दगडफेक सुरू केली. विजयी मिरवणूक काढणाऱ्या लोकांचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. त्यानंतर काही वेळातच वाद वाढून दगडफेक सुरू झाली. यादरम्यान तिथे उभ्या असलेल्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. अनेक दुकानांना आग लावण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओंचा आधार घेत 13 जणांची ओळख पटवली असून त्या सर्वांना ताब्यात घेतले आहे.
हिंसाचारानंतर जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रभर संवेदनशील भागात फिरून परिस्थिती नियंत्रित करण्यात व्यग्र होते. सकाळी शहरातील परिस्थिती सामान्य झाल्यानंतर बाजारपेठही खुली झाली होती. मात्र, गोंधळाची माहिती मिळताच, महू लष्करी छावणी परिसरातही सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती. निमलष्करी दलाची एक तुकडीही तणावग्रस्त भागात तैनात करण्यात आली होती. रात्रीच्या वेळी पोलिसांसोबतच लष्कराचे जवानही चौकात तैनात होते.
दोन्ही गटांकडून दगडफेक : इमाम
मध्यप्रदेशातील महू येथे झालेल्या वाद आणि दगडफेकीच्या घटनेसंदर्भात सोमवारी जामा मशिदीचे इमाम मोहम्मद जबीर यांचे एक विधान समोर आले आहे. आपल्या वक्तव्यात त्यांनी नमाज असताना बाजूने एक मिरवणूक आवाज करत तिथून जात होती असे म्हटले आहे. तसेच नमाज संपल्यानंतर, सर्वजण बाहेर पडल्यानंतर दोन्ही गटांकडून दगडफेक झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुरुवातीला मशिदीच्या आवारात सुतळी बॉम्ब फेकल्याचा दावाही त्यांनी केला.
तेलंगणातही लाठीचार्ज
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या लोकांवर तेलंगणा पोलिसांनीही लाठीचार्ज केल्याची घटना निदर्शनास आली आहे. भाजप नेत्याने यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत काँग्रेस सरकारला अनेक प्रश्नांची विचारणा केली आहे. भारतीय जनता पक्षाचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी लाठीचार्जचा व्हिडिओ शेअर करत भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा आनंद साजरा करण्यापासून रोखण्यासाठी हैदराबाद पोलिसांनी दिलसुखनगरमध्ये नागरिकांना लाठीचार्ज केल्याचे म्हटले आहे. करीमनगरमध्येही असेच दृश्य पाहायला मिळाले. काँग्रेसशासित राज्यांमध्ये हा एक नवीन डाव आहे का? ते कोणाला खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत? भारतीयांनी आपल्या देशाचा विजय कुठे साजरा करावा? अशी विचारणा भाजपने केली आहे.