व्हेनेझुएलात मादुरोंच्या विजयानंतर हिंसा सुरू
अध्यक्षीय प्रासादानजीक लोकांची गर्दी : निकाल चुकीचा असल्याची अमेरिकेची टिप्पणी
वृत्तसंस्था/ काराकस
दक्षिण अमेरिकेतील देश व्हेनेझुएलामध्ये अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या विजयानंतर व्यापक स्तरावर निदर्शने सुरू झाली आहेत. निवडणुकीच्या निकालात फेरफार करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केल्यावर जनता रस्त्यांवर उतरली आहे. हजारोंची गर्दी देशाच्या विविध हिस्स्यांमध्ये निदर्शने करत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळही करण्यात आली आहे. तर हजारो लोक राजधानी काराकस येथील अध्यक्षीय प्रासादानजीक एकवटले आहेत.
काही निदर्शकांनी अध्यक्षीय प्रासादाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी रबरी गोळ्या झाडल्या तसेच अश्रूधूराचा वापर केला. राजधानीपासून 400 किलोमीटर अंतरावरील कुमाना येथे जमावाने मादुरो यांच्या युनायटेड सोशलिस्ट पार्टीच्या कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता.
28 जुलै रोजी व्हेनेझूएलामध्ये निवडणूक झाली होती. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात विरोधी पक्षांचे उमेदवार एडमंडो गोंजालेज यांना अत्यंत सहजपणे विजय मिळणार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. परंतु निवडणुकीचा निकाल याच्या उलट लागला. निकोलस मादुरो यांना विजयी घोषित करण्यात आले. परंतु विरोधी पक्षांनी हा निकाल मान्य करण्यास नकार दिला आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणीत फेरफार केल्याचा दावा विरोधी पक्षांनी केला आहे.
निवडणूक निकालानुसार अध्यक्ष मादुरो यांना 51.2 टक्के तर विरोधी पक्षांचे नेत गोंजालेज यांना 44.2 टक्के मते मिळाली. मादुरो यांच्या विजयानंतर विरोधी पक्ष आणि जनता संतप्त झाली आहे. रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांनी मादुरो यांचे बॅनर फाडले आहेत. तसेच मादुरो यांच्यापूर्वी अध्यक्ष राहिलेले ह्यूगो शावेज यांचे अनेक पुतळे पाडविण्यात आले आहेत.
ह्यूगो शावेज यांनी एक दशकापेक्षा अधिक काळापर्यंत व्हेनेझुएलाचे नेतृत्व केले होते. तसेच मादुरो यांची त्यांनी स्वत:चा उत्तराधिकारी म्हणून निवड केली होती. मादुरो हे मागील 11 वर्षांपासून सत्तेवर आहेत. तर अलिकडच्या निवडणुकीतील विजयानंतर मादुरो हे आता 2030 पर्यंत सत्तेवर राहणार आहेत.
सत्तापालटाचा प्रयत्न : मादुरो
व्हेनेझुएलात सत्तापालटाचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीनंतर असे घडणार याचा अंदाज होता, परंतु विरोधकांचा कट यशस्वी होऊ देणार नाही असे मादुरो यांनी टीव्हीवरील स्वत:च्या संबोधनात नमूद केले आहे. व्हेनेझुएला अनेक वर्षांपासून आर्थिक संकटाला तोंड देत आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे हा देश जागतिक स्तरावर एकाकी पडला आहे. व्हेनेझुएलामध्ये कच्च्या तेलाचे मोठे साठे आहेत.
पराभव अमान्य : विरोधी पक्ष
निकोलस मादुरो यांना सत्तेवरून हटविण्यासाठी विरोधी पक्ष हे गोंजालेज यांच्यासोबत एकजूट झाले होते. आमच्या आघाडीला जनतेचे समर्थनप्राप्त आहे. सत्तारुढ पक्षाने गैरप्रकार केल्यानेच एडमंडो गोंजालेज विजयी होऊ शकले नसल्याचा दावा विरोधी पक्षाच्या नेत्या मारिया मचादो यांनी केला. मचादो या व्हेनेझुएलातील विरोधी पक्षांच्या आघाडीच्या सर्वात मोठ्या नेत्या आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीमुळे त्यांना निवडणूक लढविता आलेली नाही. याचमुळे त्यांनी गोंजालेज यांना समर्थन दिले होते. व्हेनेझुएलात काय घडले हे पूर्ण जगाला ठाऊक आहे, निवडणूक निकालात गैरप्रकार झाले आहेत असे म्हणत गोंजालेज यांनी स्वत:च्या समर्थकांना हिंसा न करण्याचे आणि शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने घेतली दखल
व्हेनेझुएलातील निवडणूक निकालावर विश्वास नाही. हा निकाल व्हेनेझुएलाच्या जनतेच्या इच्छांना प्रतिबिंबित करत नसल्याचे अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ, युरोपीय महासंघ समवेत अनेक देशांनी व्हेनेझुएलाला पारदर्शक पद्धतीने निकाल जारी करण्याची सूचना केली आहे. तर निवडणूक अधिकाऱ्यांना प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदानाचा तपशील जारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मादुरो यांना चीन, रशिया आणि क्यूबा यासारख्या देशांचा पाठिंबा आहे. या देशांनी मादुरो यांचे सलग तिसऱ्या विजयानिमित्त अभिनंदन पेल आहे. तर शेजारी देश ब्राझीलचे अध्यक्ष लूला डीसिल्वा यांनी अभिनंदन करणे टाळले आहे. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेत्रो यांनीही अभिनंदन करणे टाळले आहे.