बांगलादेशात हिंसा सुरूच, 39 जणांचा मृत्यू
निदर्शकांकडून जाळपोळ : शासकीय वृत्तवाहिनीच्या कार्यालयाला पेटविले
वृत्तसंस्था /ढाका
बांगलादेशात शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने आता उग्र झाली आहेत. निदर्शकांनी गुरुवारी रात्री बांगलादेशची शासकीय वृत्तवाहिनी बीटीव्हीच्या मुख्यालयाला आग लावली. तसेच निदर्शकांनी 60 हून अधिक वाहने पेटवून दिली. पंतप्रधान शेख हसीना यांनी बुधवारीच बीटीव्हीला मुलाखत दिली होती. विद्यार्थी आणि पोलीस यांच्यात झटापटी झाल्या आहेत. गुरुवारी झालेल्या हिंसेत कमीतकमी 18 जण मारले गेले आहेत. याचबरोबर 2500 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर हिंसेतील एकूण बळींची संख्या आता 39 झाली आहे. बांगलादेशात सुरू असलेली हिंसा पाहता तेथील भारतीयांनी मायदेशी धाव घेतली आहे. हिंसेनंतर तेथे अडकून पडलेले 300 हून अधिक भारतीय, नेपाळी आणि भूतानी नागरिक मेघालय येथे पोहोचले. यातील बहुतांश जण हे विद्यार्थी आहेत. शेजारी देशात राहत असलेल्या भारतीयांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विदेश मंत्रालयाच्या संपर्कात असल्याचे आसाम सरकारने म्हटले आहे.
न्यायालयाच्या निर्णयामुळे हिंसा
बांगलादेशात शासकीय नोकऱ्यांकरता 56 टक्के आरक्षण आहे. यात स्वातंत्र्यसेनानींच्या वारसांना 30 टक्के, मागास जिल्ह्यांसाठी 10 टक्के, महिलांसाठी 10 टक्के, अल्पसंख्याकांसाठी 5 टक्के आणि दिव्यांगांना 1 टक्के आरक्षण सामील आहे. 2018 मध्ये शेख हसीना सरकारने आरक्षणाचा कोटा समाप्त केला होता, परंतु 5 जून रोजी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला पुन्हा आरक्षण लागू करण्याचा आदेश दिला. हसीना सरकारने या निर्णयाच्या विरोधात दाद मागितली, परंतु सर्वोच्च न्यायालयाने जुना निर्णय कायम ठेवल्याने विद्यार्थी भडकले आहेत. आता आरक्षणाच्या विरोधात निदर्शने होत आहेत.
विद्यार्थ्यांना न्याय मिळणार : पंतप्रधान
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बुधवारी देशाला संबोधित केले होते. आरक्षणविरोधी आंदोलनात झालेल्या मृत्यूंच्या चौकशीसाठी एक न्यायालयीन चौकशी समिती स्थापन केली जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना देशाच्या न्यायप्रणालीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन पेले आहे.