विनेश फोगाट करोडोमध्ये खेळणार
अनेक नामांकित ब्रँड करार करण्यासाठी उत्सुक : नीरज चोप्रा, मनू भाकरचीही मोठी झेप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगाटचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक थोडक्यात हुकले. पदक जरी जिंकता आले नसले तरी तिचा भाव आता चांगलाच वधारला आहे. पॅरिस ऑलिम्पिकवरुन परत आल्यावर धुमधडाक्यात तिचे स्वागत करण्यात आले. दिल्लीपासून ते हरियाणापर्यंत चाहत्यांनी तिच्या स्वागतासाठी हजेरी लावली होती. आता, विनेशच्या ब्रँडची किंमत चांगलीच वाढल्याचे पहायला मिळत आहे. यापूर्वी काही लाखांमध्ये करार करणारी विनेश आता चक्क कोटींच्या घरात पोहोचली आहे. देश व विदेशातील अनेक नामांकित कंपन्या तिच्याशी करार करण्यास उत्सुक आहेत.
यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये 50 किलो गटात विनेश फोगाटचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याने तिला फायनलमध्ये खेळता आले नाही. असे जरी असले तरी तिने संपूर्ण स्पर्धेत अनेक नामांकित खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला. याशिवाय, ती राष्ट्रकुल व एशियन चॅम्पियन खेळाडू आहे. आता, ऑलिम्पिकमध्ये जरी तिला पदक मिळाले नसले तरी तिच्या संघर्षात संपूर्ण देश तिच्या मागे राहिला.
पॅरिस ऑलिम्पिकनंतर विनेशचे संपूर्ण आयुष्यच बदलले. कारण या ऑलिम्पिकमधून तिला पदक मिळाले नसले तरी तिची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. विशेष म्हणजे, या वाढलेल्या प्रसिद्धीचा फायदा तिला आर्थिक कमाईच्या बाबतीतही झाला आहे. यापूर्वी विनेश एका करारासाठी 24 ते 30 लाख रुपये घेत असे पण आता तिच्या ब्रँड व्हॅल्यूत मोठी वाढ झाली आहे. याआधी लाखोत करणारी विनेश आता चक्क कोटीच्या घरात पोहोचली आहे. स्पोर्ट्स क्षेत्रातील नामांकित अशा नाईके, सिटी स्पोर्ट्स याशिवाय फुड पॅकेजिंग, आरोग्य, ज्वेलरी व हिरे व बँकिग क्षेत्रातील अनेक कंपन्या तिच्याशी करार करण्यास उत्सुक आहेत. या कंपन्यांच्या कराराची रक्कमही 75 लाख ते 1 कोटी पर्यंत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्याच्या घडीला देश व विदेशातील जवळपास 15 कंपन्या विनेशशी करार करण्यास उत्सुक आहेत, यामुळे विनेश आपला कुस्तीतून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेते का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नीरज, मनू भाकरची करोंडोची झेप
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात नीरज चोप्राने रौप्यपदकाची कमाई केली. या कामगिरीसह तो सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची किमया त्याने केली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेला नीरज अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्याशी करारबद्ध आहे. यातच पॅरिसमध्येही पदक जिंकल्यानंतर त्याच्या ब्रँड व्हॅल्यूत मोठी वाढ झाली असून ती जवळपास 430 कोटी रुपयापर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याशिवाय, नेमबाज मनू भाकरलाही मोठा फायदा झाला असून अनेक कंपन्या तिच्याशी करार करण्यास उत्सुक आहेत.