For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कसोटी मालिकेत न्यूझीलंडची विंडीजवर आघाडी

06:55 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
कसोटी मालिकेत न्यूझीलंडची विंडीजवर आघाडी
Advertisement

विंडीजचा 9 गड्यांनी पराभव, सामनावीर जेकब डफी, मिचेल रे यांचे प्रत्येकी 3 बळी

Advertisement

वृत्तसंस्था / वेलिंग्टन

सामनावीर जेकब डफीच्या शानदार आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने शुक्रवारी येथे खेळाच्या तिसऱ्याच दिवशी विंडीजचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करुन ही दुसरी कसोटी जिंकली. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडने विंडीजवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील पहिली कसोटी अनिर्णीत राहिली होती.

Advertisement

या दुसऱ्या कसोटीत विंडीजने पहिल्या डावात 205 धावा जमविल्यानंतर न्यूझीलंडने आपला पहिला डाव 9 बाद 278 धावांवर घोषित करुन विंडीजवर 73 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर न्यूझीलंडच्या भेदक आणि अचूक गोलंदाजीसमोर विंडीजचा दुसरा डाव 46.2 षटकांत 128 धावांत आटोपल्याने न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी केवळ 56 धावांचे आव्हान मिळाले. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 10 षटकांत 1 बाद 57 धावा जमवित आपला विजय नोंदविला.

या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या जेकब डफीने विंडीजच्या महिल्या डावात 33 धावांत 1 तर दुसऱ्या डावात 38 धावांत 5 असे एकूण 71 धावांत 6 बळी मिळविले. विंडीजने 2 बाद 32 या धावसंख्येवरुन शुक्रवारी तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे सुरूवात केली. पण उपाहारापर्यंत त्यांनी आणखी तीन गडी गमविताना 66 धावांची भर घातली. उपाहारावेळी विंडीजची स्थिती 37 षटकांत 6 बाद 98 अशी होती. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये विंडीजचा दुसरा डाव 46.2 षटकांत 128 धावांत आटोपला. या सत्रामध्ये त्यांनी 30 धावांची भर घालताना आपले शेवटचे चार गडी गमविले.

विंडीजच्या दुसऱ्या डावाला पुढे सुरूवात झाल्यानंतर सलामीचा फलंदाज किंग एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्याने 47 चेंडूत 4 चौकारांसह 22 धावा केल्या. मिचेल रे ने शाय होपला 5 धावांवर टिपले. डफीने कर्णधार चेसला केवळ 2 धावांवर झेलबाद केले. हॉजने एकाकी लढत देत 75 चेंडूत 5 चौकारांसह 35 धावा जमविल्या. फॉक्सने त्याला बदली खेळाडू यंगकरवी बाद केले. डफीने गिव्सला पायचीत केले. त्याने 3 चौकारांसह 25 धावा जमविल्या. डफीने इमलेचला 5 धावांवर झेलबाद केले. मिचेल रे ने सील्सला खाते उघडण्यापूर्वीच तंबूचा रस्ता दाखविला. डफीने शिल्ड्सला रेकरवी झेलबाद करुन विंडीजला दुसऱ्या डावात 128 धावांवर रोखले. रॉच 5 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडतर्फे डफीने 38 धावांत 5 तर मिचेल रे ने 45 धावांत 3 तर फॉक्सने 1 गडी बाद केला. या मालिकेत डफीने सलग दुसऱ्यांदा एका डावात 5 गडी बाद केले आहेत.

न्यूझीलंडला निर्णायक विजयासाठी 56 धावांची जरुरी होती. न्यूझीलंडने 10 षटकांत 1 बाद 57 धावा जमवित चहापानापूर्वीच आपला विजय नोंदविला. विंडीजच्या फिलीपने कर्णधार लॅथमला 9 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर कॉन्वे आणि विलियमसन यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. कॉन्वेने 6 चौकारांसह नाबाद 28 तर विलियमसनने 4 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. आता उभय संघातील तिसरी आणि शेवटची कसोटी 18 डिसेंबरपासून माऊंटमाँगेनुई येथे खेळविली जाईल.

या सामन्यातील विजयामुळे न्यूझीलंड संघाला आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेत दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याची आशा निर्माण झाली आहे. या विजयामुळे न्यूझीलंडने डब्ल्यूटीसी स्पर्धेतील महत्त्वाचे 12 गुण मिळविले असून त्यांनी आता संयुक्त तिसऱ्या स्थानावर झेप घेताना पाकिस्तान आणि भारत यांना मागे टाकले आहे.

संक्षिप्त धावफलक: विंडीज प. डाव सर्वबाद 205, न्यूझीलंड प. डाव 9 बाद 278 डाव घोषित, विंडीज दु. डाव 46.2 षटकांत सर्वबाद 128 (हॉज 35, गिव्स 25, किंग 22, कॅम्पबेल 14, डफी 5-38, मिचेल रे 3-45, फॉक्स 1-39), न्यूझीलंड दु. डाव 10 षटकांत 1 बाद 57 (लॅथम 9, कॉन्वे नाबाद 28, विलियमसन नाबाद 16, अवांतर 4, फिलीप 1-17).

Advertisement
Tags :

.