विनेश फोगाटचे भारतात जंगी स्वागत
मायदेशात पोहोचताच अश्रू अनावर : बजरंग-साक्षीने दिला आधार : दिल्ली विमानतळावर चाहत्यांची मोठी गर्दी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट शनिवारी सकाळी पॅरिसहून मायदेशी परतली. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाल्यानंतर विनेशचे जोरदार स्वागत करण्यात आले. तिच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली. देशवासीयांनी दिलेलं प्रेम पाहून विनेश भावूक झालेली पहायला मिळाली. यावेळी विनेशचे कुटुंब तसेच कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया तिच्या स्वागतासाठी हजर होते. विनेश भावूक झाल्यावर साक्षी आणि बजरंग यांनी तिला धीर दिला.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो गटात विनेश फोगाटने अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. विशेष म्हणजे, ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. दुर्दैवाने, अंतिम सामन्यापूर्वी, तिचे वजन निर्धारित प्रमाणापेक्षा 100 ग्रॅम अधिक असल्याचे आढळून आले, ज्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हे प्रकरण क्रीडा लवादापर्यंत पोहोचले, पण अनेक प्रयत्नानंतरही रौप्य पदक देण्याचे तिचे अपील फेटाळण्यात आले. विनेशला कोणतेही पदक मिळाले नसले, पण सीएएसमधील सुनावणीदरम्यान संपूर्ण देश तिच्या पाठीशी उभा राहिला आणि त्याच मोठ्या उत्साहात तिचे स्वागत देखील करण्यात आले. विनेशचे विमानतळावर कोणत्याही सुवर्णपदक जिंकल्याप्रमाणेच स्वागत करण्यात आले. देशवासियांचे प्रेम, आपुलकी जमलेली गर्दी पाहून विनेश भावूक झाली. यावेळी स्वागतासाठी आलेल्या साक्षी मलिक आणि बजरंग पुनियाला कडाडून मिठी मारताना तिला अश्रू अनावर झाले होते.
गावात भव्य स्वागत
ऑलिम्पिक गाजवणाऱ्या विनेशच्या स्वागतासाठी दिल्ली विमानतळावर भला मोठा ताफा होता. या ताफ्यासह ती हरियाणातील आपल्या मुळ गावी चरखी दादरी येथे पोहोचली. गावकऱ्यांच्या उपस्थितीत तिचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. हरियाणातील अनेक नामवंत लोकही यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे, विनेश दिल्लीत उतरल्यापासून तिची सुरक्षा आणि विमानतळावरून सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
मी प्रत्येकाचे आभार मानू इच्छिते...
जरी मला पदक नाकारण्यात आले असले तरी देशवासियांकडून प्रेम व मोठा सन्मान मिळाला, तो सुवर्णपदकापेक्षा मोलाचा आहे. मी सर्व देशवासीयांचे आणि येथे आलेल्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छिते. मी स्वत: ला खूप भाग्यवान समजते की संपूर्ण देश माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
विनेश फोगाट, कुस्तीपटू
विनेशचे स्वागत एखाद्या चॅम्पियनप्रमाणे झाले. संपूर्ण देश तिच्या यशाचा साक्षीदार आहे. कठीण परिस्थितीत देशवासियांनी तिला मोठा पाठिंबा दिला, त्या सर्वांचे आभार.
बजरंग पुनिया, कुस्तीपटू