विनेश फोगाट अंतिम फेरीत
महिलांच्या 50 किलो फ्री स्टाईल कुस्तीत अफलातून कामगिरी : उपांत्य फेरीत क्युबाच्या लोपेजवर एकतर्फी मात
वृत्तसंस्था/ पॅरिस
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची दिग्गज कुस्तीपटू विनेश फोगटने महिला कुस्तीच्या 50 किलो फ्री स्टाईल प्रकारात अंतिम फेरीत धडक मारत इतिहास रचला आहे. मंगळवारी तिने क्युबाच्या गुझमान लोपेझचा 5-0 असा धुव्वा उडवला व अंतिम फेरीत प्रवेश केला. विनेश आता सुवर्णपदकासाठी लढणार आहे. या विजयासह ऑलिम्पिकच्या इतिहासात अंतिम फेरीत धडक मारणारी विनेश पहिली भारतीय पैलवान ठरली आहे. आता, विनेशची फायनल बुधवारी 7 ऑगस्ट रोजी होणार आहे.
विनेशने सुरुवातीपासून आक्रमकपणे खेळ केला. याउलट गुझमान बचावात्मक खेळ करत होती. त्यामुळे तिला 30 सेकंदांचा वेळ देण्यात आला होता. त्यात देखील ती गुण मिळवू शकली नाही, त्यामुळे विनेशला पहिला गुण मिळाला. मॅचच्या पूर्वार्धात विनेश फोगट 1-0 ने आघाडीवर होती. मॅचच्या दुसऱ्या टप्प्यात गुझमानने पलटवार करण्याचा प्रयत्न केला पण तिला यश आले नाही. दुसऱ्या टप्प्यात विनेशला 30 सेकंदांचा वेळ गुण घेण्यासाठी देण्यात आला. यामध्ये तिने 2 गुण घेत आघाडी 3-0 अशी केली. यानंतर पुन्हा 2 गुण मिळवत विनेशने आघाडी 5-0 अशी केली. सामन्याच्या अखेरीस गुझमन लोपेझने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु विनेशने तिला कोणतीही संधी दिली नाही आणि एकतर्फी विजय मिळवला.
विनेशपूर्वी ऑलिम्पिकमध्ये केवळ दोन पुरुष कुस्तीपटू अंतिम फेरीत पोहोचले आहेत. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमार आणि 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवी दहिया अंतिम फेरीत पोहोचले होते, परंतु दोघांनाही शेवटचा सामना गमवावा लागला होता.