For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विनेश फोगाट ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र

06:57 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
विनेश फोगाट ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र
Advertisement

पदकाविना मायदेशी परतणार : 100 ग्रॅम वजनाने केला घात : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाची कारवाई

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

दणक्यात ऑलिम्पिकची सेमीफायनल जिंकून फायनल गाठलेल्या भारताची दिग्गज महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले आहे. मंगळवारी विनेश फोगाटने सेमीफायनल जिंकली आणि तिच्यासोबतच संपूर्ण भारतीयांनी गोल्डन स्वप्नं पाहिली. सेमीफायनलप्रमाणेच विनेश एका दमात फायनल जिंकून कधी एकदा गोल्ड मेडल देशासाठी घेऊन येईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. पण, कोट्यावधी भारतीयांच्या स्वप्नांचा चुरडा झाला असून 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेशला ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित करण्यात आले आहे. स्पर्धेतील नियमानुसार विनेशला कोणतेही पदक मिळणार नाही, यामुळे तिला पदकाविना मायदेशी परतावे लागणार आहे.

Advertisement

यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे कारण सांगत तिला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आल्याने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाने ही कारवाई केली आहे. ऑलिम्पिक नियमानुसार विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही. विनेशला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्याने भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेला मोठा धक्का बसला आहे.

वजन कमी करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा

यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत् विनेशने 50 किलो वजनी गटात भाग घेतला आहे. सेमीफायनलचा सामना संपल्यानंतर मंगळवारी (6 ऑगस्ट) रात्री विनेशचे वजन 52 किलो होते. फायनलचा सामना खेळण्यासाठी इतके वजन पुरेसे नव्हते. यासाठी तिने सायकलिंग, स्किपिंग इत्यादी व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आले नाही. गगन नारंग, आहारतज्ञ दिनशॉ परडीवाला, तिचे पती, फिजिओ, वैद्यकीय कर्मचारी आणि भारतीय अधिकारी यांनी मिळून तिचे वजन कमी करण्यासाठी रात्रभर प्रयत्न केले. बुधवारी सकाळी पुन्हा वजन केल्यानंतर ते 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त आले. आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या नियमानुसार, कुस्तीपटूला त्याच श्रेणीत आपले वजन दोन दिवस राखायचे असते मात्र विनेशला तसे करता आलं नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफने मिळून तिचे वजन कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. नियमात राहून विनेशचे रक्तही काढले गेले आणि केसही कापले गेले, पण एवढे करूनही 100-150 ग्रॅम अतिरिक्त वजनाने तिचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन फिरवला, पीटी उषा यांच्याशी चर्चा

विनेशला अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशला अपात्र ठरवल्यानंतर आता भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली. पंतप्रधान मोदींनी पी. टी. उषा यांना विनेश फोगटच्या प्रकरणात तिला मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, अपील दाखल करावे अशीही सूचना पीएम मोदी यांनी उषा यांना केली आहे.

अपात्रतेच्या निर्णयानंतर विनेशच्या प्रकृतीत बिघाड

पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगाटची प्रकृती बिघडली आहे. डीहायड्रेशनचा त्रास होत असल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विनेशने तिचे वजन कमी करण्यासाठी रात्रभर बरीच मेहनत केली. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होऊन ती बेशुद्ध झाली. सध्या तिच्यावर उपचार सुरु आहेत. ती मानसिकरित्या खूपच निराश आहे. ही तिची तिसरी ऑलिम्पिक स्पर्धा होती आणि ऑलिम्पिक पदकांची तिची पाटी अद्याप कोरीच आहे. यंदा तिला सुवर्ण पदक किंवा रजत पदक पटकावण्याची संधी होती. मात्र परिस्थितीने तिची ही संधी हिरावली आहे.

उपांत्य फेरीत हरलेल्या क्युबाच्या लोपेझची फायनलमध्ये एंट्री

विनेश फोगाटने मंगळवारी प्री-क्वार्टर फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन युई सुसाकीचा तर उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनियन कुस्तीपटू ओक्साना लिवाचचा पराभव केला. या विजयासह विनेशने उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत क्युबाच्या गुझमन लोपेझचा पराभव केला. ऑलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली होती. आता विनेश अपात्र ठरल्याने क्युबाच्या गुझमन लोपेझला अंतिम फेरीसाठी पात्र ठरवण्यात आलं आहे. लोपेझ व अमेरिकन सारा हिलरब्रंट यांच्यात 50 किलो गटात फायनल होईल.

विनेश फोगाटला अपात्र ठरवणारा आंतरराष्ट्रीय कुस्तीचा नियम आहे तरी काय

विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे विनेशला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  1. ज्या दिवशी सामना आहे, त्या दिवशी सकाळी कुस्तीपटूंचे वजन तपासले जाते.
  2. प्रत्येक वजनी गटातील सामने दोन दिवसांत पार पाडले जातात. त्यामुळे कुस्तीपटूला अंतिम सामना किंवा त्यामधील सामन्यांसाठी दोन्ही दिवस वजन समान पातळीवर राखावे लागते.
  3. पहिल्यांदा वजन करताना कुस्तीपटूला 30 मिनिटांचा वेळ दिला जातो. कुस्तीपटू स्पर्धकांचे वजन त्यांच्या सिंग्लेटवर मोजले जाते. बाकी शरीरावर काहीही ठेवले जात नाही.
  4. तसेच खेळाडूंना कोणताही संसर्गजन्य आजार नाही, याचीही खातरजमा करावी लागते. तसेच त्यांची नखंही कापावी लागतात.
  5. दुसऱ्या दिवशी कुस्तीपटू सामना खेळत असताना सामन्याच्या 15 मिनिटे आधी पुन्हा वजन करण्यात येते.

प्रतिक्रिया

‘विनेश, तू चॅम्पियन आहेस! तु भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहे. आजचं अपयश दुख:दायक आहे. मला वाटत असलेली निराशा मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. आम्ही सर्व तुझ्यासाठी प्रार्थना करत आहोत. आव्हान स्वीकारणं हा नेहमीच तुझा स्वभाव राहिला असून तू नक्कीच पुनरागमन करशील, असा आम्हाला विश्वास आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी

 ऑलिम्पिकमध्ये एखाद्या भारतीय खेळाडूसाठी सर्वात विनाशकारी घटना आहे.  आपण विचार करु शकत नाही की विनेश फोगाट कोणत्या स्थितीतून जात असेल, जर शक्य असतं तर मी आपलं पदक विनेशला दिलं असतं.

भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक

विनेशची अपात्रता अत्यंत धक्कादायक आहे. मी तिला ऑलिम्पिक व्हिलेज क्लिनिकमध्ये भेटले आणि तिला भारतीय ऑलिम्पिक संघटना, भारत सरकार आणि संपूर्ण देशाकडून पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. आम्ही विनेशला सर्व प्रकारचे वैद्यकीय आणि भावनिक समर्थन देत आहोत.

पीटी उषा, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या प्रमुख.

Advertisement
Tags :

.