पंचायत सदस्य विनायक वळवईकर प्राणघातक हल्ल्यातून बचावले
प्रतिनिधी/ मडगाव
रुमडामळ दवर्ली पंचायतीचे सदस्य विनायक वळवईकर यांच्यावर शुक्रवारी रात्री आके येथे जीवघेणा हल्ला करण्यात आला. शनिवारी उशिरा या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जखमी वळवईकर यांच्यावर उपचार चालू आहेत. या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंद करण्याऐवजी पोलीस सुरुवातीला वाटाघाटी करण्याची भाषा बोलत असल्याने अनेकजण संभ्रमात पडलेले आहेत.
शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. एका लाल रंगाच्या कारमधून हल्लेखोर आले होते आणि वळवईकर यांच्या कारच्या अत्यंत जवळ ठेवली व या वाहनाचा मालक कोठे आहे अशी विचारणा करु लागले आणि तेथे असलेले मेज व इतर वस्तूंची तोडफोड करु लागले.
ही घटना वळवईकर यांच्या कानावर आली तेव्हा ते घटनास्थळी आले आणि विचारपूस केली तेव्हा वळवईकर यांना मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांचा आकडा सुमारे 10 -12 इतका झाला. त्यातील एकाने वळवईकर यांच्या डोक्यावर एका बाटली हाणली यात ते जखमी झाले. त्यांना तातडीने सरकारी इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. हल्लेखोरांनी आपल्या नाकाचे हाड मोडले, डोक्यावर बिअरची बाटली फोडली, कानाचे हाड मोडले असे वळवईकर यांनी ‘तरुण भारत’ला सांगितले.
इस्पितळात त्यांची पोलिसांनी जबानी घेतली. आदल्या रात्री ज्या पोलिसांनी जबानी घेतली होती तेच पोलीस दुसऱ्या दिवशी (शनिवारी) हे प्रकरण मिटविण्यासाठी वाटाघाटीची भाषा बोलू लागल्याने वळवईकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
हा सुनियोजित हल्ला : वळवईकर
आपल्यावर करण्यात आलेला हा हल्ला अत्यंत सुनियोजित होता, अशी प्रतिक्रिया वळवईकर यांनी व्यक्त केली.
यापूर्वीही चाकूहल्ला
रुमडामळ येथे 2023 साली एक मिरवणूक काढण्यात आली होती त्यावेळी तोडफोड करण्यात आली होती. याचवेळी श्री. वळवईकर यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला होता. बेकायदा बांधकामासंबंधी आवाज उठवत असल्याबद्दल दोन गटातील वादातून हा सुरी हल्ला करण्यात आला होता. या सुरी हल्ल्यानंतर दोन्ही गटात तणाव निर्माण झाला होता व नंतर पोलिसांनी एका संशयितास अटक केली होती.