एमपीएससी परीक्षेत मुदाळचा विनायक पाटील राज्यात पहिला
शेतकऱ्याचं लेकरु झालं उपजिल्हाधिकारी : पंचक्रोशीत आनंद व्यक्त
सरवडे प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मुदाळ,ता भुदरगड येथील विनायक नंदकुमार पाटील राज्यात पहिला आला. आठ महिन्यांपूर्वी त्याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली होती. त्याने उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्याने राज्यात राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विनायकची परिस्थिती गरिबीची आहे. आई वडील शेती करतात. त्याचे प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर मुदाळ, आठवी ते बारावीचे शिक्षण प.बा.पाटील विद्यालय मुदाळ व पदवीचे शिक्षण फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे झाले आहे. पदवी नंतर स्वतः अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत दोन वेगवेगळ्या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश मिळवून आदर्श निर्माण केला आहे.
आठ महिन्यांपूर्वी त्याची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली होती. त्याचे प्रशिक्षण नागपूर येथे सुरू आहे. २०२२ मध्ये त्यानी उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा दिली होती. त्यामध्ये तो राज्यात पहिला आला आहे. ३ जानेवारी रोजी या पदासाठी मुलाखती झाल्या.त्यामध्ये त्याची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली.
ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेवून कोणतेही क्लास न लावता त्याने स्वतःच्या अभ्यासाने हे यश संपादन केले असून या विभागातील एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या यशाने ग्रामीण भागातील मुलांसमोर आदर्श निर्माण झाला असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गावातील तरुणाने राज्यात प्रथम येवून मुदाळचे नाव राज्यात पोहचविल्याने गावात फटाक्यांची आतषबाजी व साखरपेढे वाटून आनंद व्यक्त केला जात आहे. या यशाबद्दल विनायकची गावात आज शुक्रवारी मिरवणूक काढण्यात येणार आहे.परिस्थितीचा विचार न करता जिद्द व अभ्यासातील सातत्य ठेवल्यास यश निश्चित मिळते. आई वडील, शिक्षक यांची प्रेरणा मिळाल्याने हे यश मिळाले अशी प्रतिक्रिया विनायकने दिली.