Kolhapur News : चंदगड तालुक्यात शेतकरी चिंतेत; वन्य प्राण्यांचा वाढता वावर
गवी-रेड्यांचे कळप गावाजवळील शेतात
चंदगड : चंदगड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांचा वाढता वावर लक्षात येत असून, शेतकरी वर्गात तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गवी-रेड्यांचे कळप गावाजवळील शेतशिवारात मुक्तपणे वावरताना दिसत असून, परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. रविवारी सकाळी चंदगडच्या पश्चिमेला निमुजगे परिसरात तलावाजवळ एका वाघाने बैलावर हल्ला केला. मात्र बैलाच्या प्रतिकारामुळे वाघाने ऐनवेळी पळ काढला. या घटनेत बैल जखमी झाला आहे.
दरम्यान, जांबरे परिसरात कालपासून हतीचा वावर दिसून येत असून त्याने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. विशेषतः ऊसाच्या पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. कोकरे गावाजवळील शेतातून रविवारी सकाळी गवी-रेड्यांचा कळप जाताना पथिकांना दिसून आला. याच वेळी चंदगड येथील माऊली हॉटेलचे मालक गावडे हे या भागातून प्रवास करत असताना धावत जाणारा गवी-रेड्यांचा कळप त्यांच्या निदर्शनास आला.
त्यांनी काढलेले छायाचित्र समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. वन्य प्राण्यांच्या सततच्या वावरामुळे शेती, पशूधन आणि मानवी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर वनमंत्री यांनी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी चंदगड येथील प्रगतशील शेतकरी अजित बांदेकर यांनी केली.