पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये विनयला सुवर्ण
वृत्तसंस्था/कैरो, इजिप्त
भारताचा उदयोन्मुख पॅरा पॉवरलिफ्टिंग स्टार विनयने येथे सुरू असलेल्या पॅरा पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 72 किलो वजन गटाच्या कनिष्ठ विभागात सुवर्णपदक पटकावले. विनयने 137, 142 व 147 किलो वजन तीन प्रयत्नात उचलले. तिसऱ्या प्रयत्नात त्याने 147 किलो वजन उचलले. पण रेफरींनी ते अवैध ठरविले असले तरी दुसऱ्या प्रयत्याने त्याने उचललेले 142 किलो वजन सुवर्ण मिळवून देण्यास पुरेसे ठरले. त्याने पोलंडच्या मिकोलाज कोसियुबिन्स्कीला मागे टाकले. 141 किलो वजन उचलणाऱ्या मिकोलाजला रौप्य तर इक्वेडोरच्या सेबॅस्टियन एफ (137 किलो) याला कांस्यपदक मिळाले. उत्तरप्रदेशमधील गोरखपूरच्या विनयचे हे प्रमुख आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी त्याने इजिप्तमध्येच शर्म अल शेख येथे 2024 मध्ये झालेल्या पॅरा पॉवरलिफ्टिंग वर्ल्ड कपमध्ये ज्युनियर 59 किलो वजन गटात खेळताना 120 किलो वजन उचलत सुवर्ण मिळविले होते. येथील स्पर्धेत भारताने 25 पॅरा पॉवरलिफ्टर्सचे बलवान पथक पाठवले असून त्यात 3 कनिष्ठ 22 वरिष्ठ खेळाडूंचा समावेश आहे.