दापोलीचा ‘जलवीर’ विनय कुलाबकर
मलेशिया व सिंगापूरमध्ये जलक्रीडेवर सुवर्णमुद्रा
प्रतिक तुपे/दापोली
मनात जिद्द असेल तर कोणताही खेळ अवघड नसतो, हे सिद्ध करत दापोली तालुक्यातील उटंबर येथील विनय विश्वनाथ कुलाबकर या तऊण खेळाडूने समुद्राच्या लाटांवरील धाडसी जलक्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण आणि कांस्य पदकांची कमाई करत आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरी जिह्यासह दापोलीचे नाव कोरले आहे. विंड सर्फिंग ा आयक्यू फॉईल वॉटर स्पोर्ट या अत्यंत कठीण व रोमांचक खेळात अवघ्या एका वर्षाच्या सरावानंतर विनयने मोठी झेप घेतली. मलेशियामध्ये सुवर्ण तसेच सिंगापूरमध्ये दोन कांस्य पदके मिळवत त्याने दापोलीचा झेंडा उंचावला. याशिवाय मुंबईत नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकवले. सध्या तो पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी जोमाने प्रशिक्षण घेत आहे.
समुद्राशी मैत्री, धैर्याची उंच भरारी
केवळ 16 वर्ष वय असलेल्या विनयने दांडेकर विद्यालय, केळशी येथे शिक्षण घेत असताना नौदलात भरती होऊन देशसेवेचे स्वप्न पाहिले. या स्वप्नपूर्तीसाठी त्याने गोवा, मांडवी येथील नेव्ही युथ स्पोर्टस कंपनीत प्रवेश घेतला. हा खेळ साधा नाही. समुद्रात शिड लावलेली विशेष होडी वाऱ्याच्या प्रचंड वेगाने पुढे सरकत असते. त्या क्षणी खेळाडूचा तोल, संतुलन आणि नियंत्रण यांची खरी परीक्षा होते. कोणतेही यांत्रिक साधन किंवा इंजिन नसताना फक्त धैर्य, शरीरसामर्थ्य आणि मानसिक तयारीच्या जोरावर ही क्रीडा पार पडते. विनयची मेहनत, शिस्त आणि हार न मानण्याची वृत्ती हाच त्याच्या यशामागचा मुख्य आधार आहे, असे त्याचे प्रशिक्षक हेमंत पपोला यांनी सांगितले.
कोकणचा मान वाढवणारा दुर्मीळ खेळाडू
रत्नागिरी जिह्यातून या जलक्रीडा प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारा विनय हा एकमेव खेळाडू आहे. कोकण किनारपट्टी समुद्राशी जोडलेली असली, तरी खोल समुद्रात खेळल्या जाणाऱ्या जलक्रीडा अजूनही दुर्मिळ आहेत. त्यामुळे विनयने केलेली दमदार घोडदौड ही संपूर्ण जिह्यासाठी अभिमानाची बाब आहे. आज कोकणातील तऊण वेटलिफ्टिंग, जलतरण, कुस्ती, सायकलिंग अशा अनेक क्रीडाप्रकारांत आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी करत आहेत. पण सर्वांगीण क्रीडा संस्कृती विकसित होण्यासाठी अशा खेळाडूंना प्रचार व प्रोत्साहन मिळणे अत्यावश्यक आहे.
शासन व समाजाकडून पाठबळाची गरज
क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांना आवश्यक त्या सोयीसुविधा, आर्थिक साहाय्य आणि आधुनिक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले गेले तर विनयसारखे खेळाडू ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा नक्कीच फडकवू शकतात. विनय पुढील स्पर्धांसाठी सज्ज होत असून त्याचे मुख्य ध्येय नौदलात भरती होऊन देशसेवा करणे हे आहे. मलेशिया सिंगापूर या ठिकाणी विनयने रत्नागिरी जिह्याची दापोली तालुक्याचे नाव उंचावले आहे.
खेळ निवडा, भविष्य घडवा
मैदानी खेळांपासून विद्यार्थी दूर जात असल्याची खंत व्यक्त करत विनय म्हणतो, लहानपणी हातात मोबाईल न देता बॅट-चेंडू किंवा खेळ साधन द्या. आवडता खेळ स्वयं निवडा ा क्रिकेट असो, कबड्डी असो किंवा जलक्रीडा. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि नेव्ही, पोलीस, आर्मी अशा नोकऱ्यांचेही दार उघडते. त्याच्या या संदेशातूनही त्याचयातील शिस्त आणि क्रीडाप्रेम दिसून येते. उटंबरचा विनय कुलाबकर हा केवळ पदक विजेता खेळाडू नसून कोकणाच्या समुद्राची जिद्द आणि धैर्य यांचे प्रतीक आहे. त्याच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळाले तर हा “जलवीर“ जगभर भारताचा जयघोष नक्कीच करेल.