आशालता देवी, बेमबेम यांचा सर्वोत्तम संघात समावेश
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
एएफसी महिलांच्या आशिया चषक स्पर्धेतील सर्वकालीन सर्वोत्तम संघामध्ये भारताच्या लिजेंट्स महिला फुटबॉलपटू बेमबेम देवी आणि आशालता देवी यांचा समावेश करण्यात आला आहे. आशिया खंडातील महिलांच्या फुटबॉल स्पर्धेत भारताच्या या दोन महिला फुटबॉलपटूंचे योगदान महत्त्वाचे असल्याने त्यांना या सर्वोत्तम संघात स्थान देवून गौरव करण्यात आला आहे. बेमबेम देवी भारतीय फुटबॉल संघाची माजी कर्णधार आहे. फुटबॉल क्षेत्रातील तिच्या योगदानाबद्दल तिची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस यापूर्वीच करण्यात आली आहे. आशिया चषकासाठी महिलांच्या सर्वकालीन सर्वोत्तम संघामध्ये मणिपूरच्या बेमबेम देवी आणि आशालता देवी यांचा समावेश करुन त्यांना गौरविण्यात आले आहे.
गेल्या दोन दशकांच्या फुटबॉल कारकिर्दीमध्ये बेमबेम देवीने भारतीय फुटबॉल संघाचा दर्जा सुधारण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले आहेत. आशिया फुटबॉल कॉन्फडरेशनने भारताच्या या दोन महिला फुटबॉलपटूंच्या योगदानाची दखल घेवून त्यांना सर्वकालीन सर्वोत्तम महिला फुटबॉल संघामध्ये स्थान देण्याचा निर्णय घेतला. 2003 साली झालेल्या एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत बेमबेम देवीने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तसेच तिची एआयएफएफतर्फे 2003 च्या कालावधीत दोनवेळा सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू म्हणून निवड झाली होती. दक्षिण आशियाई परिसरातील देशांमध्ये महिलांच्या फुटबॉलचा पाया भक्कम करण्यासाठी बेमबेम देवीचे प्रयत्न कौतुकास्पद म्हणावे लागतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्वाधिक सामने खेळणाऱ्या महिला फुटबॉलपटूंच्या यादीत बेमबेम देवी तिसऱ्या स्थानावर आहे.
2022 साली भारतात झालेल्या महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला फुटबॉल संघाचे नेतृत्व आशालता देवीने केले होते. तिच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात यजमान भारताने बलाढ्या इराणला गोल शुन्य बरोबरीत राखले होते. भारतीय महिला फुटबॉल संघातील बचावफळीची पूर्ण जबाबदारी आशालता देवीवर नेहमीच राहिली होती. 2022 साली तिने एएफसी महिलांच्या आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत पदार्पण केले होते. 2019 साली तिची एआयएफएफच्या सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली होती. 2026 ची एएफसी महिलांची आशिया चषक फुटबॉल स्पर्धा ऑस्ट्रेलियात 1 ते 21 मार्च दरम्यान होणार आहे.