सरकारी इस्पितळात घेण्यास बेळगुंदीच्या ग्रामस्थाला टाळाटाळ
शिवाजी सुंठकर यांनी जाब विचारताच करून घेतले दाखल
वार्ताहर/किणये
बेळगुंदी गावातील एका इसमाला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. यानंतर माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांनी दवाखान्यामध्ये धाव घेऊन संबंधित डॉक्टरांना जाब विचारताच त्वरित ‘त्या’ इसमाला दवाखान्यात दाखल करून घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले. शेतकरी शट्टुपा चव्हाण हे बुधवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीच्या ठिकाणी दाखल होण्यासाठी आले होते. त्यांच्या पायांना सूज आली होती तसेच त्यांना गॅगरिंग असा प्रकार झाला होता. त्यामुळे त्यांना अतोनात वेदना होत होत्या. त्यावेळी पत्नी त्यांच्यासोबत होती. मात्र इमर्जन्सी वॉर्डाच्या ठिकाणी त्यांना दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. याची माहिती माजी महापौर शिवाजी सुंठकर यांना समजताच त्यांनी दवाखान्याकडे धाव घेतली.
तिथल्या डॉक्टरांना चांगलाच जाब विचारत जर गोरगरीब जनतेला योग्य प्रकारे सेवा देत नसाल तर काय करायचे असे म्हणून त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर संबंधित डॉक्टरांनी शट्टुप्पा चव्हाण यांना दाखल करून घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केले. त्यांनी आपल्या उपचारासाठी घरातील दोन जनावरेही विकली आहेत. मात्र खर्च परवडेनासा झाला असून, आजावरील वेदनाही असह्य झाल्या, त्यांचा आजार वाढल्यामुळे ते सरकारी दवाखान्यात दाखल झाले आहेत. त्यांना दानशूर मंडळींकडून मदतीची गरज आहे. सुंठकर यांच्यासोबत निंगाप्पा जाधव, कलेहोळ येथील संजय पाटील व इतर उपस्थित होते.