जिल्ह्यातील ग्रामपंचायती होणार हिरव्यागार! प्रत्येक गावात करणार 400 वृक्षांचे रोपण
माझी वसुंधरा-5.0 योजनेंतर्गत लागवड
संग्राम काटकर कोल्हापूर
गावागावातील वातावरण प्रदुषणमुक्त करण्याबरोबर ते हिरवेगार बनवून स्वच्छ हवा तयार करण्याचा उद्देश घेऊन महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेली ‘माझी वसुंधरा-फाईव्ह पॉईंट झिरो’ योजना जिह्यात अंमलात आणली जात आहे. जिह्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतींतर्फे विविध जातींची प्रत्येकी 400 झाडे लावली जाणार आहेत. सदर बाजारमधील सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून रोपांचा पुरवठा करण्यास सुऊवात झाली आहे. गावपातळीवर होणाऱ्या या वृक्षारोपणामुळे पर्यावरण सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. गावेही हिरवीगार होऊन मुबलक ऑक्सिजन निर्मितीलाही चालना मिळणार आहे. त्याचे फायदे भावी पिढ्यांनाही मिळून त्यांचे जीवन सुरक्षित राहण्यात मदत होणार आहे.
प्रगतीसाठी तोडल्या जाणाऱ्या झाडांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. त्यामुळेच उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्याच्या ऋतुमानात अनिश्चितता आली आहे. उद्योगधंद्यासह इतर कारणांनी हवेचे प्रदूषणही शहरासह गावागावांना सतावत आहे. तापमानवाढीचे संकट वाढतच आहे. अशा परिस्थितीत शुद्ध हवा व ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी झाडे लावल्याशिवाय पर्याय नाही. त्यासाठी जिह्यात ‘माझी वसुंधरा-फाईव्ह पॉईंट झिरो’योजना कामी येणार आहे. अंमलबजावणीसाठी जिह्यातील प्रत्येक गावाला योजनेत सामावले जाणार आहे.
चार लाख 23 हजार रोपांची निर्मिती...
पर्यावरण संवर्धनाला चालना देणारी ‘माझी वसुंधरा योजना पूर्ण क्षमतेने अंमलात आणण्यासाठी सदर बाजारमधील सामाजिक वनीकरण विभागाने महत्वपूर्ण काम केले आहे. विभागाने अखत्यारीतील शासकीय रोपवाटिका केंद्रांमध्ये राज्यपुष्प जाऊलसह सागवान, चिंच, आपटा, चाफा, वड, फणस, पपई, पिंपळ, आडुळसा, जास्वंद, जांभुळ, पाम, आवळा, कडूलिंब, बहावा, शेवगा, सिताफळ, अर्जुन, गुळवेल, कदंब, टेंबुर्णी, कांचन, करंज, मोहोगणी, शिसव, हाडजोड व दाम बकुळ या विविध औषधीसह फळे आणि दाट सावली देणाऱ्या विविध रोपांची निर्मिती केली आहे. तब्बल 4 लाख 23 हजार रोपे सामाजिक वनीकरण विभागांकडे उपलब्ध आहेत.
योजनेच्या नियमानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला 400 रोपे लावावी लागणार आहेत. ग्रामपंचायतीचा कारभार पाहत झाडांचे संगोपनही ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांना करावे लागणार आहे. आगामी काळात लावलेल्या झाडांपैकी काही झाडे मऊन पडली तर त्या जागी दुसरी रोपे लावण्याचे बंधनही ग्रामपंचायतीला पाळावे लागणार आहे. योजना शंभर टक्के सफल करण्यासाठी हे बंधन घातले आहे. त्यानुसार रोपे लावून त्यांचे संगोपन केल्यास त्यांना आपले गाव हिरवेगार, प्रदुषण मुक्त आणि पर्यावरणपुरक केल्याची अनुभूती येणार आहे.
शासनाची योजना चळवळ म्हणून राबवा...
जिह्यात तेराशे गावे आहे. या गावांच्या ग्रामपंचायतींनी ‘माझी वसुंधरा-फाईव्ह पॉईंट झिरो’ योजना पर्यावरण संवर्धन चळवळ म्हणून राबवणे आवश्यक आहे. वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायतींना रोपांचे वाटप सुऊ आहे. ज्या ग्रामपंचायतींनी रोपे घेतलेली नाहीत, त्यांनी ती लवकर घ्यावी. मिळणारी रोप गावातील गायरान क्षेत्र व रस्त्यांकडेला लावली जावीत. रोपांवर तणनाशके फवारली जाणार नाही, याचीही काळजी घ्यावी.
प्रियांका दळवी (वनपरिक्षेत्र अधिकारी, करवीर : सामाजिक वनीकरण विभाग)