विकास यादव यांच्या जीवाला धोका
पन्नूविरोधात न्यायालयाकडे धाव : मिळाला दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेत खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या विकास यादवने दिल्ली न्यायालयात एक अर्ज करत सुनावणीस गैरहजर राहण्याची सूट देण्याची मागणी केली आहे. माझ्यासंबंधीचा सर्व तपशील समोर आल्याने जीवाला धोका निर्माण झाला असल्याचे विकास यादवने म्हटले होते. तर न्यायालयाने विकास यादवला सूट देत 3 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
18 डिसेंबर रोजी विकास यादवला खंडणीवसुली आणि अपहरण प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. त्यापूर्वीच अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने विकास यादव याचे नाव पन्नूच्या हत्येचा कट रचणारा आरोपी म्हणून घोषित केले होते. विकास यादवला एप्रिल महिन्यात तुरुंगातून जामिनावर मुक्त करण्यात आले होते. यानंतर 18 ऑक्टोबर रोजी एफबीआयने त्याला वाँटेड घोषित केले होते.
भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवालयाने विकास यादवला नियुक्त केले होते असा आरोप एफबीआयने केला होता. तर भारताच्या विदेश मंत्रालयाने विकास यादव आता भारत सरकारचा कर्मचारी नसल्याचे स्पष्ट केले होते. तर दुसरीकडे विकास यादवने दिल्ली पोलिसांनी माझ्याविरोधात खोटा गुन्हा नोंदविला असल्याचा दावा न्यायालयासमोर केला आहे.
छायाचित्रे, घराचा पत्ता आता सार्वजनिक झाला आहे. अशा स्थितीत आता सार्वजनिक ठिकाणी मला धोका आहे. जीवाला धोका असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देखील उपस्थित राहू शकत नाही, कारण माझे लोकेशन ट्रॅक केले जाऊ शकते असे विकास यादवने म्हटले होते.
यादवच्या अर्जावर विचार करत न्यायालयाने त्याला 3 फेब्रुवारीपर्यंतच्या सुनावणीपर्यंत अनपुस्थित राहण्याची सूट दिली ओह. तर दिल्लीतील एका व्यापाऱ्याने विकास यादवचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी कनेक्शन असून तो खंडणीवसुली आणि अपहरणात सामील असल्याची तक्रार नोंदविली होती.