For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मणिपूरमध्ये पुन्हा आगडोंब

06:58 AM Nov 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
मणिपूरमध्ये पुन्हा आगडोंब
Advertisement

मुख्यमंत्र्यांसह आमदारांच्या निवासावर हल्लाबोल : सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद : 23 जणांना अटक

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

गेल्या दीड वर्षांपासून होरपळत असलेल्या ईशान्येकडील मणिपूर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. राज्यात वेगवेगळ्या भागात निदर्शने आणि आंदोलन सुरू असून जमावाकडून वाहने व सार्वजनिक मालमत्तांना आगही लावली जात आहे. राजधानी इंफाळमध्ये उसळलेल्या हिंसाचारानंतर अनेक भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तणावाची परिस्थिती पाहता सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. संतप्त जमावाने तीन मंत्री आणि सहा आमदारांच्या घरांना आग लावली. यादरम्यान गाड्या, वाहने जाळल्याप्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

संतप्त जमावाने राज्यातील मंत्री आणि आमदारांसह लोकप्रतिनिधींच्या घरांना आणि मालमत्तेला लक्ष्य केले आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. इंफाळमध्ये सुरक्षा बळकट करण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत. जमावाला पांगवण्याच्या प्रयत्नात आठ जण जखमी झाले आहेत. तसेच आंदोलकांनी मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्यासह त्यांच्या जावयांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. त्यांची मालमत्ता जाळण्यात आली, तर सुरक्षा दलांनी इंफाळच्या विविध भागात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.

अफवा टाळण्यासाठी इंटरनेटवर निर्बंध

घरांची तोडफोड आणि जाळपोळीमध्ये सहभागी 23 जणांना अटक करण्यात आली आहे. या लोकांना इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम आणि विष्णुपूर जिह्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 32 पिस्तूल, 7 राउंड, 8 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अफवा टाळण्यासाठी इंटरनेट आणि मोबाईल सेवा दोन दिवसांसाठी बंद करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी एसएसपी/सीओ तणावग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकारी 24 तास परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेवून आहेत.

गेल्या आठवड्यापासून धुसफूस

11 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांच्या एका गटाने बोरोबेक्रा भागात एका पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनी हा हल्ला हाणून पाडला. यामध्ये 11 दहशतवादी मारले गेले. माघार घेत असताना अतिरेक्मयांनी पोलीस ठाण्याजवळील मदत शिबिरातून तीन महिला आणि तीन मुलांचे अपहरण केल्यानंतर त्यांची हत्या केल्याचे उघड झाले. तेव्हापासून राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंसाचार वाढत असल्याने राज्य सरकारने शनिवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती.

भाजप आमदारांच्या घरांची तोडफोड

निदर्शनादरम्यान जमावाने भाजप आमदाराच्या घराची तोडफोड केली आणि त्यांच्या मालमत्तेला आग लावली. आंदोलकांनी भाजप आमदार सपम कुंजकेसर यांच्या इंफाळ पश्चिम येथील तेरा येथील निवासस्थानावरही हल्लाबोल चढवत त्यांच्या मालमत्तेची तोडफोड केली. आमदार निवासाच्या बाहेर उभ्या असलेल्या कारलाही आग लावण्यात आली. जिह्यातील थांगमेईबंद येथील भाजपचे आणखी एक आमदार जॉयकिशन सिंह यांच्या निवासस्थानाचीही तोडफोड करण्यात आली आहे. आंदोलकांनी वांगखेई मतदारसंघातील जेडीयुचे आमदार टी. अऊण आणि लंगथाबलमधील भाजप आमदार करम श्याम यांच्या घरांनाही घेराव घातला.

पंतप्रधानांनी दौरा करावा : राहुल गांधी

मणिपूरमध्ये दीड वर्षांहून अधिक काळ कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये जातीय हिंसाचार होत आहे. अलीकडे हिंसाचाराच्या अनेक घटनांमुळे तणाव वाढला आहे. वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण जिरीबामसह इंफाळ खोऱ्यात आणि आसपासच्या टेकड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष झाला होता. या मुद्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ‘एक्स’ पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघर्षग्रस्त भागाचा दौरा करून या दिशेने काम करण्याचे आवाहन केले आहे.

‘अफ्स्पा’ हटवण्याचे केंद्राला आवाहन

केंद्राने गुऊवारी जिरीबामसह मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रात सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा (अफ्स्पा) पुन्हा लागू केला. राज्यात चालू असलेल्या वांशिक हिंसाचारामुळे सततची अस्थिर परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने नमूद केले. मात्र, मणिपूर सरकारने केंद्राला राज्याच्या सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागू करण्यात आलेला ‘अफ्स्पा’ कायदा काढून टाकण्याची विनंती केली. तथापि, केंद्र सरकारने अद्याप यावर कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

हिंसाचारामागील कारण

दोन दिवसांपूर्वी जिरी नदीत तीन मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे संतापलेल्या लोकांनी मंत्र्यांच्या घरी जाऊन पाहिले, मात्र मंत्री राज्यात नसल्याचे समजले. यानंतर संतप्त लोकांनी घराची तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या. हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी लोकांनी इंफाळमध्ये निदर्शने करत 24 तासांच्या आत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. परिस्थिती भडकल्याने इंफाळमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याचदरम्यान जिरीबाममध्ये अपहरण करण्यात आलेल्या सहा जणांचे मृतदेह सापडल्याच्या विरोधात खोऱ्यातील जिह्यांमध्येही नव्याने निदर्शने सुरू झाली आहेत. बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे इंफाळ खोऱ्यातील इंफाळ पूर्व आणि पश्चिम, विष्णुपूर, थौबल आणि काकचिंग जिल्ह्यात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.