विजयेंद्र ‘बाहुबली’, कोण ठरणार ‘कटाप्पा’?
कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र हे आगामी काळात भाजपची मोठी जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज झाले आहेत. अलीकडेच त्यांच्याकडे कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्षपद सोपवण्यात आले असून त्यांनी पदभार स्वीकारुन प्रत्यक्ष कृतीला सुरुवातही केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा विचार करता विजयेंद्र यांच्यासाठी आगामी काळ हा कसोटीचा असणार आहे, हे नक्की. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र यांच्या खांद्यावर कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अध्यक्षपद कोणाकडे सोपविणार? याची चर्चा होती. विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी पक्षाला सहा महिने लागले. कोणत्याही परिस्थितीत येडियुराप्पा किंवा त्यांच्या कुटुंबीयांना प्रमुखपद द्यायचे नाही असे पक्षातील त्यांच्या विरोधकांचे म्हणणे होते. त्यामुळेच अध्यक्षपदासाठी पर्यायी नावांचा विचार सुरू होता. मात्र, आपल्या हयातीतच चिरंजीवाचे राजकीय पुनर्वसन करण्याची इच्छा मनी बाळगून कामाला लागलेल्या येडियुराप्पा यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर मात केली आहे. म्हणून पक्षाने अंतर्गत विरोध बाजूला सारून विजयेंद्र यांच्या नावाची घोषणा केली आहे. आता विरोधी पक्षनेता निवडण्यासाठी शुक्रवारी 17 नोव्हेंबर रोजी भाजप संसदीय पक्ष बैठक होणार आहे. स्वत: नूतन अध्यक्षांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे बेळगावच्या हिवाळी अधिवेशनाआधी विरोधी पक्षनेत्याचीही निवड होणार आहे.
घराणेशाहीला थारा देणार नाही ही आधीपासून भाजपची भूमिका होती. या भूमिकेमुळेच गेल्या विधानसभा निवडणुकीत अनेकांना उमेदवारीही मिळाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तर घराणेशाहीला विरोध आहेच. सध्या सुरू असलेल्या पाच राज्यातील निवडणूक प्रचारातही अनेक ठिकाणी पंतप्रधानांनी याचा पुनरुच्चार केला आहे. घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध कायम असता तर विजयेंद्र यांची निवड झाली नसती. आता राजकारणात नीतीमूल्यांपेक्षा विजय मिळविणे, हेच प्रमुख लक्ष्य आहे. याबरोबरच कर्नाटकात राबविलेले अनेक प्रयोग फसले. केंद्रीय नेतृत्वाने महिनाभर कर्नाटकात तळ ठोकूनही केवळ 66 जागांवर समाधान मानावे लागले. याचाच अर्थ नव्या प्रयोगांपेक्षा कर्नाटकात जातीची समीकरणेच अधिक प्रभावी ठरतात, याचा उमग भाजपला झालेला दिसतो. म्हणून विजयेंद्र यांच्यावर पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधून त्यांनी पदभारही स्वीकारला आहे. त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पक्षातील अनेक वरिष्ठ नाराज झाले आहेत. ही नाराजी दूर करण्यासाठी हायकमांडबरोबरच विजयेंद्र यांनाही पावले उचलावी लागणार आहेत. त्याची तयारीही त्यांनी केली आहे.
पक्षाध्यक्षपदावर लिंगायत नेत्याची निवड झाल्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद इतरांना मिळणार आहे. त्यासाठीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. माजी केंद्रीयमंत्री बसनगौडा पाटील-यत्नाळ यांची विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागणार, अशी अटकळ होती. आता या पदासाठी आर. अशोक, व्ही. सुनीलकुमार, सुरेश कुमार आदी नावे चर्चेत आहेत. शुक्रवारी होणाऱ्या भाजप संसदीय पक्ष बैठकीत विरोधी पक्षनेते पदाची निवडणूक जाहीर करणार की आमदारांचे मत ऐकून नंतर निर्णय घेणार, हे स्पष्ट होणार आहे. भाजपमधील सध्याची धूसफूस लक्षात घेता विजयेंद्र यांच्यासाठी अध्यक्षपद हे काटेरी मुकुटच ठरणार आहे. कारण आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ही निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या पाच गॅरंटी योजनांमुळे आणि भाजपमधील अंतर्गत कलहामुळे मतदारांचा कल काँग्रेसकडे झुकतो आहे, हे लक्षात आल्यानेच कर्नाटकात विजयेंद्र यांची निवड करून हायकमांडने अनेकांना धक्काच दिला आहे. कारण येडियुराप्पा विरोधकांची एक मोठी फळी सक्रिय राजकारणातून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दूर ठेवण्यासाठी कार्यरत होती. त्यामुळेच अनेकवेळा येडियुराप्पा यांना अपमान सहन करावा लागला आहे. विरोधक वरचढ ठरले होते. मात्र, येडियुराप्पा यांनी पुन्हा पक्षावर आपले नियंत्रण राखण्यात यश मिळविले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्याचा दौरा करण्याचे येडियुराप्पा यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यांना हायकमांडच्या माध्यमातून आवर घालण्यात विरोधक यशस्वी ठरले होते. आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जड होणार, याची लक्षणे दिसू लागल्यानंतर भाजपने सावध भूमिका घेतली आहे. त्यांच्यातील सामर्थ्यामुळेच आपण विजयेंद्र यांची निवड केल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष सांगत असले तरी येडियुराप्पा यांचे चिरंजीव ही त्यांची ओळख त्यांच्या निवडीला हातभार लावणारी ठरली आहे. आपल्या हयातीतच राजकीय वारसदाराची जडणघडण बघण्याची इच्छा बाळगणारे येडियुराप्पा निश्चितच आपल्या चिरंजीवाला यशस्वी ठरविण्यासाठी कामाला लागणार हे निश्चित आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत चित्र बदलण्यात मदत होणार आहे, हा या निवडीमागचा हेतू आहे.
विजयेंद्र यांच्या निवडीनंतर बसनगौडा पाटील-यत्नाळ, सी. टी. रवी, व्ही. सोमण्णा आदींसह अनेक ज्येष्ठ नेत्यांवर नाराजी ओढवली आहे. येडियुराप्पा सत्तेवर असताना त्यांच्याविरुद्ध बसनगौडा यांनी उघडपणे आघाडी उघडली होती. येडियुराप्पा आणि त्यांचे चिरंजीव विजयेंद्र हे भ्रष्ट आहेत. त्यामुळेच त्यांचे नेतृत्व आपल्याला मान्य नाही, हे स्पष्टपणे सांगणाऱ्या बसनगौडा यांच्याबद्दल हायकमांडकडे तक्रार करूनही त्यांच्यावर कसलीच कारवाई झाली नव्हती. याचाच अर्थ येडियुराप्पा आणि त्यांच्या कुटुंबीयांना भाजपच्या किंवा पक्षाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्यासाठी सक्रिय असणाऱ्या त्यांच्या राजकीय विरोधकांना कोणाचे तरी बळ नक्कीच लाभले असणार. आता ज्या विजयेंद्र यांच्यावर बेछूट आरोप करण्यात आले, त्यांचीच हायकमांडने पक्षाध्यक्षपदी निवड केली आहे. यामुळे भाजपमधील अनेक वरिष्ठ नेत्यांची पंचाईत झाली आहे. विजयेंद्र यांचे नेतृत्व मान्य करायचे की बंड करून तेथून बाहेर पडायचे? हे अनेकांना कळेनासे झाले आहे. काही जणांनी तर संयमाची भाषा बोलण्यास सुरुवात केली आहे. भाजपने खेळलेल्या या खेळीमुळे लोकसभेच्या अधिकाधिक जागा जिंकण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस नेत्यांना धक्काच बसला आहे. कर्नाटकात आता राजकारण चांगलेच रंगणार आहे.