अरबी समुद्रात होडी बुडून सुमारे 1 कोटीचे नुकसान
आठ मच्छीमार बांधवांना वाचविण्यात यश
कारवार : येथून नऊ नॉटिकल माईल्स अंतरावरील लाईट हाऊसजवळ अरबी समुद्रात होडी बुडून सुमारे 1 कोटी रुपयांची हानी झाल्याची घटना मंगळवारी घडली. तथापि होडीवरील आठ मच्छीमार बांधवांना वाचविण्यात स्थानिक मच्छीमार बांधवांना यश आले. याबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, उडुपी जिल्ह्यातील मालपे येथील सीहंटर नावाची होडी मालपेहून अरबी समुद्रातून महाराष्ट्राच्या दिशेने निघाली होती. येथून नऊ नॉटिकल माईल्सच्या अंतरावरील लाईट हाऊसजवळ होडीचा तळभाग खडकावर आदळला आणि लोखंडावर केलेले वेल्डिंग निकामी झाले. त्यामुळे होडीच्या इंजिनच्या भागात पाणी शिरायला सुरुवात झाली. दुर्घटनाग्रस्त होडीवरील धोका ओळखून स्थानिक मच्छिमार बांधवांना अडचणीत सापडलेल्या त्या आठ मच्छीमार बांधवांना पहिल्यांदा वाचविले. त्यानंतर दुर्घटनाग्रस्त होडी किनाऱ्याकडे ओढून नेण्याचा प्रयत्न केला. तथापि, होडीच्या इंजीन भागात पाण्याने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने होडी समुद्रात बुडाली. स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने होडीवरील आठ मच्छीमारांनी बैतखोल मासेमारी बंदर गाठले आहे.