विजय हजारे चषक वनडे स्पर्धा आजपासून
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ निवडण्याच्या दृष्टीने अनेक खेळाडूंवर राहील नजर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विजय हजारे चषकासाठीची राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धा आज शनिवारपासून देशभरात सुरू होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीला आठ आठवड्यांपेक्षा कमी कालावधी राहिलेलाza असताना या स्पर्धेत एक दर्जेदार ‘रिस्ट स्पिनर’, रिषभ पंतला आधार देऊ शकणारा दुसरा यष्टीरक्षक यांच्या जागा भरून काढण्याच्या दृष्टीने आणि प्रमुख वेगवान गोलंदाजांवर फॉर्मवर लक्ष केंद्रीत होईल.
50 षटकांच्या सामन्यांतील प्रमुख संघ सध्या ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेत उतरलेला आहे. असे असले, तरी या स्पर्धेला महत्त्व आहे. कारण बडोदाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यासारख्या काही खेळाडूंना खेळण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळेल. पंजाबचा अर्शदीप सिंग, मध्य प्रदेशचा आवेश खान, राजस्थानचा खलील अहमद, बंगालचा मुकेश कुमार, उत्तर प्रदेशचा यश दयाल यांचा संघात स्थान मिळविण्याच्या दृष्टीने आपला भक्कम दावा सादर करण्याचा प्रयत्न असेल.
मांडीच्या दुखापतीतून कुलदीप यादव सावरत असल्याने राष्ट्रीय निवड समितीला अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर यांच्या बरोबरीने सक्षम पर्याय शोधणे भाग पडू शकते. वरुण चक्रवर्ती आणि गुजरातचे रवी बिश्नोई हे दोन ‘रिस्ट स्पिनर्स’ असे आहेत ज्यांनी दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत प्रभावी कामगिरी केली. चक्रवर्ती आज शनिवारी विशाखापट्टणम येथे चंदिगडविऊद्ध खेळेल अशी अपेक्षा आहे. तो केवळ 17 अ श्रेणी सामने खेळलेला असला, तरी 4.25 च्या इकोनॉमी रेटने त्याने 41 बळी मिळविलेले आहेत. गुगली गोलंदाज बिश्नोई 25 ‘अ’ श्रेणी सामने खेळलेला असून त्याने प्रति षटक 5.25 धावा देत 36 बळी मिळविलेले आहेत.
62 एकदिवसीय सामन्यांमध्ये 47 पेक्षा जास्त सरासरी राखलेला श्रेयस अय्यर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या संघात प्रवेश करू शकेल की, 29 ‘अ’ श्रेणी सामन्यांत 52 पेक्षा अधिक सरासरी असलेला आणि पाच शतकांची नोंद केलेला तिलक वर्मा त्याच्यावर दबाव आणेल याचेही उत्तर स्पर्धेतून मिळणार आहे. हैदराबादतर्फे तिलक वर्माच्या कामगिरीवर निवड समिती लक्ष ठेवेल आणि अय्यरचा मुंबईला सय्यद मुश्ताक अली चषक मिळवून दिल्यानंतर त्याची पुनरावृत्ती घडविण्याकडे कल राहील.
फिट असल्यास मोहम्मद सिराज बुमराहच्या बरोबरीने संघात राहील, तर आकाश दीप आणि हर्षित राणा यांच्यापैकी एकट्याला संधी मिळू शकते. यामुळे आणखी एक किंवा दोन वेगवान गोलंदाजांसाठी जागा राहते आणि अर्शदीप, दयाल, मुकेश त्याचा विचार करून अंतिम 15 खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतील. मोहम्मद शमीचा विचार करता असे दिसते की, त्याचे लक्ष आयपीएलकडे वळले आहे.